ज्येष्ठ व्यंगचित्रकार दिवंगत आर. के. लक्ष्मण यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध लेखिका कमला लक्ष्मण (वय ८८) यांचे दीर्घ आजाराने शनिवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे. कमला लक्ष्मण यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.
कमला लक्ष्मण यांचे शिक्षण मद्रास (सध्याचे चेन्नई) येथे झाले. वडिलांची बदली झाल्यामुळे त्या दिल्लीला आल्या. तेथील इंद्रप्रस्थ महाविद्यालयामध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. आर. के. लक्ष्मण यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लक्ष्मण यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. त्या पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या. मात्र, आपल्यामधील कलाकार बाजूला ठेवून त्या आर. के. लक्ष्मण यांच्याशी समरस झाल्या. कमला लक्ष्मण यांनी दहा पुस्तकांचे लेखन केले होते. त्यांच्या ‘तेनाली राम’ या पुस्तकावर दूरदर्शनने १३ भागांची मालिका केली होती. ‘छोटा हाथी’ हे त्यांचे मूळ तमिळ भाषेतील पुस्तक गाजले होते. हस्तकला, प्रवास आणि वाचन हे त्यांचे छंद होते.