03 March 2021

News Flash

पालिका रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभाग कधी?

पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात २०११ पासून रखडलेला अतिदक्षता विभाग मनुष्यबळाअभावी अजूनही सुरू झालेला नाही.

| July 31, 2015 03:11 am

पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात २०११ पासून रखडलेला अतिदक्षता विभाग मनुष्यबळाअभावी अजूनही सुरू झालेला नाही. या रुग्णालयात ‘निओनॅटल आयसीयू’ म्हणजे नवजात अर्भकांचा अतिदक्षता विभाग सुरू असला तरी ‘अॅडल्ड आयसीयू’ कधी सुरू होणार हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे.
२०११ मध्ये कमला नेहरू रुग्णालयातील अतिदक्षता विभाग तयार झाला, तर या विभागासाठीचा ‘सेन्ट्रल ऑक्सिजन पाइपलाइन’चा प्रकल्प २०१४ मध्ये पूर्ण झाला. या विभागासाठी तज्ज्ञ डॉक्टरांसह एकूण १२४ पदे मंजूर झाली आहेत. तज्ज्ञ डॉक्टर मिळत नसल्यामुळे हा विभाग रखडला असून, तोपर्यंत बंधपत्रित डॉक्टरांच्या आधाराने विभाग चालवण्याचाही एक प्रस्ताव आहे.
रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजेंद्र जोशी म्हणाले, ‘आमच्याकडे नवजात अर्भकांचा अतिदक्षता विभाग कार्यरत असून, त्यासाठी मनुष्यबळदेखील उपलब्ध आहे. अॅडल्ट आयसीयू सुरू नसून त्याला मनुष्यबळाची समस्या आहे. परंतु मनुष्यबळासाठी आरोग्यप्रमुखांच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.’
संसर्गजन्य रोगांच्या नायडू रुग्णालयातही अतिदक्षता विभाग नाही. या रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. फ्रान्सिस बेनेडिक्ट म्हणाले, ‘रुग्णालयात एकूण २०० खाटा असून, स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी त्यातील ६० खाटा वेगळय़ा ठेवल्या आहेत. गरज भासल्यास या रुग्णांकरिता अजूनही खाटा उपलब्ध करून देता येतील. अतिदक्षता विभागाची सोय रुग्णालयात नसून त्याची गरज भासल्यास आम्ही रुग्णाला ससूनमध्ये पाठवतो.’

‘मनुष्यबळ उपलब्ध झाल्यावर कमला नेहरू रुग्णालयातील अतिदक्षता विभाग सुरू होईल. नायडू रुग्णालयात सध्या अतिदक्षता विभागाचा प्रस्ताव नाही. त्यामुळे सध्या पालिका रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागाची सुविधा नाही.’
– डॉ. एस. टी. परदेशी, आरोग्यप्रमुख
स्वाइन फ्लूला सुरुवात
बुधवारी शहरात स्वाइन फ्लूचे २ रुग्ण सापडले असून, सध्या शहरात उपचार घेणाऱ्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या ६ झाली आहे. या ६ पैकी २ रुग्ण वॉर्डात उपचार घेत असून चौघांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. जानेवारीपासून आतापर्यंत पुण्यात स्वाइन फ्लूचे ८२८ रुग्ण सापडले असून, त्यातील ९० रुग्णांचा मृत्यू झाला, तर ७३३ रुग्ण पूर्णत: बरे होऊन घरी गेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 3:11 am

Web Title: kamla nehru hospital icu patient
टॅग : Patient
Next Stories
1 घोरपडी उड्डाणपुलाचा प्रश्न लवकरच सुटणार
2 आर्थिक मदत आली, पण माळीण पुनर्वसन रखडलेलेच!
3 खंडणीसाठी शिक्षकानेच केले पाचवीच्या विद्यार्थ्यांचे अपहरण
Just Now!
X