माझी म्हणून सुख-दु:ख कुरवाळत बसायला मला वेळ मिळत नाही. एका भूमिकेच्या सुख-दु:खातून बाहेर पडलो की, दुसऱ्या भूमिकेच्या सुख-दु:खाचा जोगवा मागतो. नाटक-चित्रपट हा माझा कित्ता गिरवणं असतं. या अभिव्यक्तीतून मी पोहोचण्याचा प्रयत्न करतो. अच्युत पालवच्या हाताची चवच वेगळी आहे. त्याच्या हाताने अक्षर वळतात आणि घडतात. आता सगळं सहज, सोपं मिळतयं. त्यामुळे आळस आलाय. महापुरुषांची नावे घेऊन आपले कोतेपण लपवण्याची वृत्ती वाढते आहे. थोडी वेगळी पायवाट धुंडाळायला वेळच होत नाही, अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी मर्मावर बोट ठेवले.
प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांच्या ‘काना-मात्रा-वेलांटी’ या देवनागरी सुलेखन कित्त्याचे प्रकाशन नाना पाटेकर आणि चैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने नर्मविनोदी शैलीत नाना पाटेकर यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देत शब्दमैफल रंगविली.
शाळेत असताना मी वांड होतो. विद्यार्थ्यांमध्ये कधी बसलोच नाही. सारखं मारायला कोण उठणार म्हणून गुरुजी मला आपल्याजवळ बसवून घ्यायचे. अंगठे धरण्याची शिक्षा मिळायची. त्यामुळे फळ्यावरचे सुविचार मी नेहमी उलटेच वाचले. पण, माझे अक्षर सुंदर. मित्रांच्या लग्नपत्रिका मीच लिहिल्या. सर्वाची लग्नं अजूनही टिकून आहेत हाच त्या अक्षराचा फायदा. जे. जे. कला महाविद्यालयात माझाही कॅलिग्राफी विषय होता. हल्ली थोडं काही केलं की प्रदर्शन भरविण्याची आणि मार्केटिंग करण्याची हौस असते. अच्युतने २५ वर्षांच्या साधनेनंतर वेगवेगळे प्रयोग केले, अशा शब्दांत पाटेकर यांनी पालव यांचा गौरव केला. अच्युत जे पेरतो आहे ते रुजू दे अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
मला माहीत असलेली मुंबई आणि पुणं आता लोप पावलेय. पुण्यामध्ये आम्ही तिरकसं बोलत असलो तरी आपुलकी असायची. ही आपुलकी लोप पावली असून भांडणं आणि गाडय़ांची जाळपोळ का होतेय, असा सवालही पाटेकर यांनी केला.
देगलूरकर म्हणाले, शब्द आणि अक्षर ही मानवाची मूलभूत अभिव्यक्ती आहे. त्यातही शब्दापेक्षा अक्षराला महत्त्व आहे. काळाच्या ओघात नष्ट होणारी कला पालव यांनी पुन्हा आपल्यासमोर आणली असून त्यांचा हा कित्ता अनेकांनी गिरवावा असाच आहे.
मन वळलं की पेन वळतो आणि पेन वळला की अक्षरंही वळतात, अशी भावना व्यक्त करीत अच्युत पालव यांनी आपला कलाप्रवास उलगडला.
नाटय़प्रयोग म्हणजे कित्ता गिरवणंच!
नाना पाटेकर म्हणाले, ‘नटसम्राट’ हे नाटक करावेसे वाटत होते. नाटक नाही केले तरी चित्रपट केला. त्या भूमिकेच्या अनुभवातून जात असताना कलाकार आणि माणूस म्हणूनही त्रास झाला. मला इतका त्रास होत असेल तर, डॉ. श्रीराम लागू, सतीश दुभाषी, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, राजा गोसावी यांनी इतके प्रयोग कसे केले याचेच नवल वाटले. प्रत्येक प्रयोग म्हणजे कित्ता गिरवणंच आहे. मला कित्ता गिरवता आला नाही. नट म्हणून गवसणं म्हणजे काय याचा आनंद या भूमिकेने दिला.