जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमार याच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला करणाऱ्या व्यक्तीने काल पुण्यात भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे. एप्रिल महिन्यात कन्हैया कुमार मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानाने प्रवास करत असताना मानस डेका या व्यक्तीने आपला गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचा दावा कन्हैयाने केला होता. मात्र, कन्हैयाने केवळ लक्ष वेधून घेण्यासाठीच हल्ल्याचा आरोप केल्याचे त्यावेळी मानस डेकाने म्हटले होते. मात्र, काल पुण्यात अमित शहा यांना भेटण्यासाठी आसामी शिष्टमंडळात मानस ज्योती उपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
कन्हैयावर विमानात हल्ल्याचा प्रयत्न, गळा दाबल्याचा दावा 
एप्रिल महिन्यात विमानाने पुण्याच्या दिशेने जात असताना मानस आणि कन्हैया विमानातील एकाच रांगेमध्ये बसले होते. मानस डेका खिडकीकडील सीटवर बसले होते तर कन्हैया रांगेतील शेवटच्या सीटवर बसला होता. मानस ज्योती यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. मी सीटवरून उठताना आधारासाठी कन्हैयाच्या खांद्याला धरल्यावर त्याचा अर्थ कन्हैयाने गळा दाबण्याचा प्रयत्न केला, असा लावला, असे मानस ज्योती यांनी म्हटले होते. मात्र, कन्हैयाने मानस हा भाजपचा कार्यकता असल्याचा दावा केला होता. या प्रकारानंतर कन्हैया आणि मानस ज्योती या दोघांनाही जेट एअरवेजच्या विमानातून खाली उतरविण्यात आले होते. मानस डेका टीसीएसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत.