घटना बदलण्यासाठी बहुमत मिळवणे हा भाजपचा एकमेव उद्देश असल्याचे चित्र सध्या दिसत असून सरकार राज्यघटना आणि लोकशाहीवर घाला घालण्याचे काम करत आहे, असा आरोप कन्हैया कुमारने पुण्यात केला. या विरोधात लढा उभारला असून शेवटच्या क्षणापर्यंत लढा देत राहील, असेही कन्हैया म्हणाला.

लोकशाहीप्रधान देशामध्ये जवानांवर हल्ले, शेतकरी आत्महत्या, विद्यार्थी आत्महत्या ही  हिंसेची लक्षणे असून देशात असहिष्णुता वाढली आहे, असे सांगत त्याने असहिष्णुतेच्या मुद्यावर पुन्हा एकदा भाष्य केले. देशातील कोणताही वर्ग सुखी नसून प्रत्येक घटकाचे शोषण होत आहे. याकडे सरकार लक्ष देत नाही, असेही कन्हैया यावेळी म्हणाला. आमचा कोणा एका राजकीय पक्षाच्या विरोधात लढा नाही, तर फक्त मनुवादी वृत्ती विरोधात लढा आहे, असे त्याने स्पष्ट केले.

सामाजिक आंदोलन आणि विरोधक नसल्याने सत्ताधाऱ्यांवर बंधन राहत नाही.  संसदेमध्ये विरोधी नेता नाही, असा टोला त्याने काँग्रेसला लगावला. देशातील सर्व शैक्षणिक संस्थांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यक्तींची नियुक्ती केली जात असून सरकार यातून भगवेकरण करत आहे, असा गंभीर आरोपही त्याने केला. देशातील विविध स्तरातून कन्हैया कुमार भविष्यात राजकारणात सक्रिय होईल, अशी चर्चा अनेकदा रंगताना दिसली. या चर्चेला कन्हैयाने पूर्णविराम दिला. भविष्यात कधीही राजकारणात जाणार नसून समाजातील प्रत्येक घटकासाठी लढत राहणार आहे, असे त्याने सांगितले.  देशातील जवान सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना शहीद होतात. याच सीमेवर लढताना माझा भाऊ देखील शहीद झाला. देशातील कोणत्या मंत्र्याचा मुलगा सैन्य दलात दाखल झाला आहे का ? असा सवालही त्याने केला. सरकार विरोधात बोलले तरी गुन्हा दाखल केला जातो, भविष्यात पतंजलीची वस्तू खरेदी न केल्यास देशद्रोहाचा गुन्हा दाखल करतील, असा टोलाही त्याने भाजप सरकारला लगावला.