– राष्ट्रवाद, जातीयवादाच्या मुद्दय़ांवरून मोदी सरकारवर टीका
पंतप्रधान, राष्ट्रपतींच्या दौऱ्याइतकाच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने कन्हैयाकुमारची सभा आणि त्याचा पुणे दौरा रविवारी चर्चेत आला. मोठय़ा बंदोबस्ताची खुद्द पोलीस दलातही चर्चा होती. बालगंधर्व रंगमंदिर परिसरातील कडेकोट बंदोबस्ताच्या छावणीतच त्याची सभा झाली. ‘भारत माता की जय म्हणणारेच राष्ट्रवादी हे ठरवण्याचा ठेका कुणी दिला, असा सवाल उपस्थित करून ‘पोलिसांचे कंत्राटीकरण सुरू केले, आता संसदेचेही कंत्राटीकरण होईल,’ अशी टीका कन्हैयाकुमारने या सभेत केली.
पुरोगामी विद्यार्थी युवक संघर्ष समितीतर्फे कन्हैयाकुमार याच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. काही संघटनांचा सभेला असणारा विरोध या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. सभेसाठी चळवळी, डाव्या विचारसरणीच्या संघटनांच्या  कार्यकर्त्यांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होते. सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातील कार्यकर्तेही या सभेसाठी आले होते. मात्र बालगंधर्व रंगमंदिराची आसन क्षमता संपल्यानंतर पोलिसांनी आत सोडणे बंद केले. त्याच्या निषेधार्थ रंगमंदिराच्या बाहेर उभ्या असलेल्या काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. महापौर प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, भालचंद्र कांगो, प्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर, संध्या गोखले, मेधा पानसरे, बाबा आढाव, किरण मोघे या वेळी उपस्थित होते.
विमानाऐवजी कन्हैया खासगी वाहनाने पुण्याकडे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुन्हा पोलिसांनी बंदोबस्तात बदल केला. देहूरोड जवळील किवळ्यापासून कन्हैयाला पोलीस बंदोबस्तात कार्यक्रमस्थळी आणले. एवढा बंदोबस्त राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनादेखील देण्यात येत नाही, अशी प्रतिक्रिया पोलीस दलात उमटली. मात्र, कार्यक्रम शांततेत झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
कन्हैया बोल…
मन की बात करताना मराठवाडा, धारावीचेही ऐकून घ्या. पोटाचा प्रश्न तीव्र झाल्यावर, लोक रस्त्यावरच उतरणार. मग त्यांची बोटे कमळ किंवा हाताकडेही जाणार नाहीत.
– भारतमातेचे स्वरूप बदलून तिच्या हातातील पिकाची जुडी काढून भगवा झेंडा दिला. राष्ट्रध्वज बदलायलाही ते कमी करणार नाहीत.
– निर्थक योजनांवर करदात्यांच्या खिशातील पैसा फुकट घालवला जात आहे. यांच्यासाठी फक्त ‘मेक इन इंडिया’च्या कार्यक्रमाचे व्यासपीठ जळले. मात्र आमचे काळीज जळले कारण तो आमच्या खिशातील पैसा होता.
– इंग्रजांची फोडा आणि राज्य करा नीतीच मोदी सरकार वापरत असून जात आणि भाषेच्या आधारे समाजात फूट पाडली जात आहे.
– आदिवासींसाठी काम करणाऱ्यांना नक्षलवादी ठरवले जाते, दलितांसाठी काम करणाऱ्यांना जातीयवादी ठरवले जाते. असे ‘स्टिकर’ चिकटवत तुम्ही बसा, धोरणे आता आम्हीच आखतो.