पुरोगामी विद्यार्थी युवक संघर्ष समितीतर्फे २४ एप्रिल रोजी होणाऱ्या ‘रोहित अ‍ॅक्ट आणि संविधान परिषदे’मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील युवक नेता कन्हैयाकुमार सहभागी होणार आहे. मात्र, त्याचे स्थळ दोन दिवसांत निश्चित करण्यात येणार आहे.
समितीचे संतोष शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एआयएसएफ, आरपीआय, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, इंटक, संभाजी ब्रिगेड, दलित आदिवासी संघ या संघटनांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.
कोणत्याही विद्यार्थ्यांवर जातीवादामुळे रोहित वेमुला याच्याप्रमाणे आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये यासाठी रोहित अ‍ॅक्ट लागू करण्याची मागणी या परिषदेमध्ये केली जाणार आहे. सध्याचे सरकार हे संविधानविरोधी काम करीत असल्याने संविधान परिषद घेण्यात येणार आहे, असे संतोष शिंदे यांनी सांगितले. कन्हैयाकुमार याच्या कार्यक्रमामध्ये जातीयवादी संघटनांनी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना संविधानाच्या कक्षेत राहून जशास तसे उत्तर देण्यात येईल. त्याचप्रमाणे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. सभेदरम्यान गैरप्रकार घडलाच तर त्याला गृह विभाग जबाबदार असेल, असे माओ चव्हाण यांनी सांगितले. सभेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांसमवेत पत्रव्यवहार करून आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे कन्हैयाकुमार याचे पुण्यामध्ये धुमधडाक्यात स्वागत होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.