कौमार्याच्या प्रथेविरोधात जनजागृती करणाऱ्या तरूणांना रविवारी टोळक्याकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. मारहाण करणाऱ्या टोळक्यातील तरूणही कंजारभट समाजातीलच असल्याचे समजते. या प्रकरणी पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रशांत अंकुश इंद्रेकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत इंद्रेकर (वय-२५ रा.येरवडा,पुणे.) हे काल रात्री आरोपी सनी मलके याच्या बहिणीच्या लग्नाला आले होते.त्यावेळी कौमार्याच्या संदर्भात जनजागृती का करतो? असा दम देत फिर्यादी आणि त्यांच्या भावास टोळक्याने मारहाण केली.याप्रकरणी (सनी मलके वय-२५) ,विनायक मलके (वय-२२), अमोल भाट (वय-२०), रोहित रावळकर (वय-२१), नेहुल तामचीकर (वय-२३) यांच्यासह ४० जणांविरोधात पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंजारभाट समाजामध्ये लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य चाचणी घेण्याची प्रथा आहे.या प्रथेच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी विवेक तामचीकर आणि प्रशांत इंद्रेकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी “Stop The vritual”  व्हॉटस्अॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपवरून जनजागृती करत आहेत.

फिर्यादी आणि त्यांचे कुटुंब हे पिंपरी येथील भाटनगर येथे सनी मलके याच्या बहिणीच्या लग्नाला आले होते. त्यावेळी येथील तरुणांना फिर्यादी हे कौमार्य चाचणीच्या प्रथेविरोधात जनजागृती करत असल्याचे माहीत होते. मात्र, याला जातपंचायतीचा विरोध होता. याचाच राग मनात धरून तुम्ही समाजाच्या परंपरेला विरोध का करता?, असा आक्षेप घेत प्रशांत इंद्रेकर आणि त्यांच्या भावास टोळक्याने मारहाण केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक ठुबळ यांच्या नेतृत्त्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.