प्रतिकूल वातावरणाचा उत्पादनावर परिणाम; दोन डझनाच्या पेटीचा दर १२०० ते १३०० रुपये

रत्नागिरी हापूससारखा पण काहीसा वेगळा असलेल्या कर्नाटक हापूसचा हंगाम यंदा लांबणीवर पडला आहे. मध्यंतरी दक्षिणेकडील राज्यात आलेल्या वादळामुळे तसेच त्या पाठोपाठ वाढलेल्या उष्म्यामुळे कर्नाटक हापूसच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात कर्नाटक हापूसची तुरळक आवक सुरू झाली होती. यंदा कर्नाटक हापूसचा हंगाम लांबणीवर पडला आहे.

दक्षिणेकडील कर्नाटक, केरळ राज्यात हापूस आंब्याचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. दक्षिणेकडील हापूस कर्नाटक हापूस म्हणून ओळखला जातो. कर्नाटकातील बंगळुरुपासून काही अंतरावर असलेला तुमकुर भागातील आंबा अगदी रत्नागिरी हापूसप्रमाणे असतो. भद्रावती जिल्ह्य़ातील आंब्याचे वेगळेपण रंगामुळे ओळखले जाते. भद्रावती भागातील आंबा पिवळसर असतो. गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात कर्नाटक हापूसची तुरळक आवक सुरू झाली होती. त्या वेळी बाजारात दररोज तीनशे ते चारशे पेटय़ा कर्नाटक हापूस आंब्याची आवक बाजारात व्हायची. यंदा मात्र कर्नाटक हापूसची आवक जवळपास ऐंशी टक्के कमी आहे, असे निरीक्षण मार्केट यार्डातील कर्नाटक हापूसचे प्रमुख विक्रेते रोहन उरसळ यांनी नोंदविले.

एप्रिल महिन्यात  कर्नाटक हापूसची आवक जोमात सुरू व्हायची.  यंदाच्या वर्षी दक्षिणेकडील राज्यात आलेले वादळ, पाऊस आणि त्यापाठोपाठ वाढलेला उष्मा अशा प्रतिकूल वातावरणाचा परिणाम कर्नाटक हापूसवर झाला. सध्या बाजारात कर्नाटक हापूसच्या ६० ते ७० पेटय़ांची आवक होत आहे. गेल्या वर्षी कर्नाटक हापूसचा हंगाम वेळेत सुरू झाला होता. त्या तुलनेत यंदा कर्नाटक हापूसचा हंगाम उशिरा सुरू होईल. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात कर्नाटक हापूसचे दुसरे पीक हाती आल्यानंतर तेथील बाजारपेठेतून कर्नाटक हापूसची मोठय़ा प्रमाणावर आवक सुरू होईल. मे महिन्यात कर्नाटक आणि रत्नागिरी हापूसची मोठी आवक होईल. तेव्हा बाजारात आंबा मुबलक प्रमाणावर उपलब्ध होईल. सध्या तरी रत्नागिरी आणि कर्नाटक हापूसचे दर उतरण्याची शक्यता नाही. गेल्या वर्षी कर्नाटक आणि रत्नागिरी आंब्याचे दर आवाक्यात होते. यंदा मात्र तशी परिस्थिती राहणार नाही. मे महिन्यात आंब्याची मोठी आवक झाल्यानंतर दर आवक्यात येण्याची शक्यता आहे, असे उरसळ यांनी सांगितले.

कर्नाटक हापूसचे घाऊक बाजारातील दर

घाऊक बाजारात रत्नागिरी हापूसच्या चार ते पाच डझनाच्या पेटीचा दर सध्या चार ते पाच हजार रुपये दरम्यान आहे. कर्नाटक हापूसच्या दोन डझनाच्या पेटीच्या दर १२०० ते १३०० रुपये दरम्यान आहे. गेल्या वर्षीचे दर पाहता सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या आंब्याचे दर आवाक्यात नाहीत.