जम्मू आणि काश्मीरमधील काही तरुणवर्ग मागील कित्येक वर्षांपासून दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. अशा मानसिकतेमधील तरुणांना बाहेर काढण्याचे आमच्यासमोर मोठे आव्हान होते. या पार्श्वभूमीवर पोलीस आणि प्रशासनामार्फत दगडफेक करणार्‍या तरुणासोबत संवाद साधून, त्या सर्वांना दगडफेक करण्याच्या प्रवृत्तीमधून बाहेर काढण्यात यश आले. आता हेच तरुण आम्हाला रोजगार मिळेल, या आशेने पाहत आहेत. जम्मू आणि काश्मीर मधील कलम 370 हटवल्याने लवकरच तेथील प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. असे मत जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सागर डोईफोडे यांनी व्यक्त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
यावेळी सागर डोईफोडे म्हणाले की, जम्मू आणि काश्मीर मधील कलम 370 हटवल्यानंतर तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. या दृष्टीने मागील तीन महिन्यात प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. या दरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडलेली नाही. तसेच आता देशातील अनेक उद्योजक आणि शैक्षणिक संस्थाकडून कशा प्रकारे विकास कामात योगदान दिले जाईल, यासाठी चर्चा सुरू आहे. साधारण सहा महिन्यानंतर विकास कामांना चालना मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.