News Flash

कात्रज प्राणिसंग्रहालयात रीघ

सध्या या प्राणिसंग्रहालयात पुणे शहर आणि जिल्ह्य़ातील नागरिक सहकुटुंब भेट देत आहेत.

कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात सुटीमुळे सध्या रोज मोठी गर्दी होत आहे. (छायाचित्रे: तन्मय ठोंबरे).

उन्हाळी सुटीमुळे ४० हजारांनी वाढ

शहरातील लोकप्रिय पर्यटन स्थळ राजीव गांधी प्राणिसंग्रहालय सध्याच्या उन्हाळी सुटीमुळे रोज हाऊसफुल होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत गेल्या महिन्यात या उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत ४० हजारांनी वाढ झाली.

दरवर्षी शाळांना सुटय़ा लागताच नागरिकांची पावले निसर्गरम्य ठिकाणांकडे वळू लागतात. पुण्यातील नागरिकांकडून कात्रज प्राणिसंग्रहालयाची निवड आवर्जून केली जाते.

सध्या या प्राणिसंग्रहालयात पुणे शहर आणि जिल्ह्य़ातील नागरिक सहकुटुंब भेट देत आहेत. गुजरातहून आणण्यात आलेली आणि संग्रहालयात अलिकडेच दाखल झालेली तेजस आणि सुब्बी ही सिंहाची नर-मादीची जोडी सध्या मुख्य आकर्षण बनली आहे. तसेच पांढरा आणि पिवळा वाघ, अस्वल, हत्ती यासह विविध प्राणी पाहण्यासाठी गर्दी होत आहे. सर्पोद्यानातील सापांचे निरीक्षण करण्यासाठीही नागरिकांची झुंबड होत आहे.

वन्यजीवनाची ही सफर करतानाच पर्यटक भोजनाचाही आनंद घेतात. प्राणिसंग्रहालयातील वेगवेगळी खेळणीही मुलांचा आनंद द्विगुणीत करत आहेत.

राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांनी सांगितले, की गेल्या वर्षी एप्रिलमध्ये एक लाख २८ हजार ६५८ पर्यटकांनी संग्रहालयाला भेट दिली. यंदाच्या एप्रिल महिन्यात एक लाख ६९ हजार ६०१ पर्यटकांनी भेट दिली. यंदा एप्रिल महिन्यातील पर्यटकांच्या संख्येत चाळीस हजारांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये सुमारे अडीच लाख पर्यटक आले होते. यंदाही एक मे रोजी १८ हजार ७३८ पर्यटक आले होते. तसेच यंदाच्या उन्हाळी सुटीच्या कालावधीत आतापर्यंत दोनशेहून अधिक परदेशी नागरिकांनी भेट दिली.

वन्यजीवांना पाहण्याबरोबर प्राणिसंग्रहालयाचे आल्हाददायक वातावरण पर्यटकांना अनुभवायला मिळते. त्यामुळे पर्यटक या निसर्गरम्य ठिकाणाचा आनंद घेण्यासाठी उद्यानात येतात. यंदा मे महिन्यातील पर्यटकांची संख्या तीन लाखांच्या पुढे जाईल असा अंदाज आहे.

डॉ. राजकुमार जाधव, संचालक, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 4:04 am

Web Title: katraj zoo tourist increases
Next Stories
1 ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’मधून वेगळ्या वाटांचा शोध
2 शहरबात पिंपरी-चिंचवड : हेवेदावे, नव्या-जुन्यांचा संघर्ष पुन्हा चव्हाटय़ावर..
3 पंधरा दिवसांत मान्सून भारतात
Just Now!
X