रेल्वेच्या २९ वाघिणींद्वारे १४.५ लाख लिटर पाणी रवाना

केरळमध्ये पावसाच्या थैमानाचे जनजीवन विस्कळीत झाले असून, पूरस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्न तेथे निर्माण झाला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी रेल्वेने पुढाकार घेतला आहे. पुणे आणि रतलाम येथून पिण्याच्या पाण्याने भरलेल्या एकूण २९ वाघिणींद्वारे केरळच्या कायनकुलम स्थानकावर तब्बल साडेचौदा लाख लिटर पाणी शनिवारी संध्याकाळी रवाना करण्यात आले आहे. साधारणत: चोवीस तासांच्या कालावधीत हे पाणी केरळला पोहोचणार आहे.

केरळमध्ये आजवरची सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काही भागात विजेसह पिण्याचे पाणीही बंद करण्यात आले आहे. अनेक ठिकणी धर्मशाळांमध्ये किंवा निवारा उभारून पूरग्रस्तांना राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई आहे. विविध ठिकाणांहून अनेक प्रकारची मदत पूरग्रस्तांना केली जात असतानाच रेल्वेने मात्र मूलभूत गरज असलेले पिण्याचे पाणी पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुणे विभागाने तातडीने पाण्याच्या वाघिणींची व्यवस्था केली. शुक्रवारी संध्याकाळपासूनच घोरपडी येथील यार्डात पुणे रेल्वेच्या पथकाने वाघिणींमध्ये पाणी भरणे सुरू

केले.रेल्वेकडे असलेल्या पाण्यासह अग्निशामक दलाच्या मदतीने बाहेरून पाणी आणून १४ वाघिण्यांमध्ये प्रत्येकी ५० हजार लिटर पाणी भरण्यात आले. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास पाणी भरण्याचे काम पूर्ण करण्यात आले.

रतलाम येथूनही पाण्याच्या १५ वाघिणी पुण्यात येणार होत्या. त्यानुसार पुण्यात इंजिनची व्यवस्था तयार ठेवण्यात आली. दुपारनंतर रतलाम येथील गाडी पुण्यात पोहोचल्यानंतर या गाडीच्या वाघिणी पुण्याच्या गाडीला जोडण्यात आल्या. त्यानंतर पाण्याने भरलेल्या २९ वाघिणी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास केरळकडे रवाना करण्यात आल्या.

पुणे रेल्वेचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिण्याच्या पाण्याची विशेष रेल्वे दौंड, वाडी, रेनुगुंटा या मार्गाने केरळच्या कायनकुलम स्थानकावर जाणार आहे. त्या ठिकाणी केरळ सरकारकडून आवश्यकता असलेल्या भागात पाण्याचे वितरण करण्यात येणार आहे.

पुणे विभागातून दुसऱ्यांदा गरजवंतांसाठी पाणी

लातूरमध्ये २०१६ मध्ये पाऊस दीर्घकाळ लांबल्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाल्यानंतर रेल्वेच्या पुणे विभागाने पुढाकार घेऊन पाण्याच्या विशेष गाडय़ा लातूरला पाठविल्या होत्या. रेल्वेच्या पाण्याच्या वाघिणी त्या वेळी आपल्याकडे उपलब्ध नव्हत्या. राजस्थानमध्ये सातत्याने विविध भागात पाणी रेल्वेने पोहोचवावे लागते. त्यामुळे तेथे या वाघिणी उपलब्ध असतात. लातूरला पाणी देण्यासाठी राजस्थानमधून पाण्याच्या वाघिणी मागविण्यात आल्या होत्या. रेल्वेने पाणी पाठविण्याचा हा पहिलाच प्रयोग होता. त्यानंतर आता केरळला पाणी पाठवून पुणे विभाग दुसऱ्यांदा गरजवंतांची तहान भागविणार आहे.