प्रभागाचे प्रगति पुस्तक

खडकमाळ आळी- महात्मा फुले पेठ

प्रभाग क्रमांक १८

विद्याधर कुलकर्णी

हातावरचे पोट असलेल्या आणि झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करीत असलेल्या कष्टकऱ्यांचे झोपडपट्टी पुनर्वसनचे प्रश्न मार्गी लागावेत, ही अपेक्षा फोल ठरली असून दाट लोकवस्तीचा भाग असल्याने नित्याची वाहतूक कोंडी या समस्येने प्रभाग क्रमांक १८ मधील नागरिक त्रस्त आहेत. चारही नगरसेवक एकाच पक्षाचे असूनही विकास काही केल्या दिसत नाही, अशी या प्रभागातील नागरिकांची व्यथा आहे.

खडकमाळ आळी-महात्मा फुले पेठ या प्रभागामध्ये हातावर पोट असलेले कष्टकरी आणि निम्न मध्यमवर्गीय नागरिकांचे वास्तव्य आहे. विडी कामगारांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. विविध समाजातील नागरिकांसह मुस्लीम लोकवस्ती असलेला परिसर याच प्रभागामध्ये येता. महात्मा फुले वाडा परिसरातील जुन्या वाडय़ांचे प्रश्न प्रलंबित आहेत. पाणी आणि मैलापाणी वाहिन्यांचे प्रश्न आ वासून उभे आहेत. स्वच्छता आणि वाहतूक कोंडी या प्रश्नांनी उग्र स्वरूप धारण केले आहे. मात्र, नगरसेवकांचे या गोष्टींकडे लक्ष दिसत नाही, अशी प्रभागातील नागरिकांची खंत आहे.

जुन्या पुण्याचा भाग असलेल्या महात्मा फुले पेठ परिसरामध्ये अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी ही पाचवीला पुजली गेली आहे. आधीच अरुंद रस्ते, दाटीवाटीची लोकवस्ती आणि वाहनांची वाढती संख्या याचा परिणाम म्हणून नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. काही रस्त्यांचे रुंदीकरण झाले असले, तरी दाटीवाटीची लोकसंख्या आणि वाहनाची वाढती संख्या ध्यानात घेता वाहतुकीची कोंडी अटळ आहे. अग्निशामक दलाचे मुख्यालय या प्रभागामध्येच येते. त्यामुळे या भागात सतत वाहतुकीची वर्दळ असते. विजयालक्ष्मी हरिहर, आरती कोंढरे, अजय खेडेकर आणि सम्राट थोरात हे चारही नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आहेत.

डॉ. कोटणीस दवाखाना म्हणजेच गाडीखाना हे या प्रभागातील महत्त्वाचे वैद्यकीय केंद्र सातत्याने बातम्यांमुळे चर्चेमध्ये असते. केवळ कुत्रं चावल्यानंतर रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गाडीखान्यामध्ये क्षयरोग आणि एचआयव्ही एड्स या विकारांवर उपचार होऊ लागले. या वैद्यकीय केंद्राचे आधुनिकीकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आता हे केंद्र आधुनिक झाले असले, तरी डॉक्टर आणि तंत्रज्ञांच्या कमतरतेमुळे येथील वैद्यकीय सेवा रुग्णांसाठी अडसर निर्माण करणारी ठरते, अशी व्यथा प्रभागातील नागरिकांनी मांडली. महापालिकेच्या वैद्यकीय केंद्रांमध्ये आरोग्य सुविधांची कमतरता जाणवते, याकडे नागरिकांनी लक्ष वेधले आहे.

या प्रभागामध्ये एकही वाहनतळ नाही. आता चारचाकी घेतली तरी ती रस्त्यावरच लावावी लागते. परिणामी रस्त्यावर लावलेल्या या गाडय़ांमुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडते. त्यामुळे वाहने लावण्यासाठी प्रभागामध्ये एखादे वाहनतळ करण्याची आवश्यकता आहे, असे निरीक्षण नागरिकांनी नोंदविले. मात्र, वाहनतळ करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही हे वास्तव आहे.

खडकमाळ आळी परिसर आणि महात्मा फुले पेठेतील जुन्या वाडय़ांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. अनेक जुने वाडे मोडकळीस आले आहेत. काही वाडेसदृश वास्तू झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत विकसित करता येऊ शकतात. मात्र, त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींची राजकीय इच्छाशक्ती असायला हवी. प्रभागाचा विकास जलदगतीने आणि र्सवकष व्हावा या उद्देशातून चारही नगरसेवक एकाच पक्षाचे निवडून दिले असले, तरी विकास काही केल्या दिसत नाही, अशी कैफियत मतदारांनी मांडली. महापालिका शाळांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारून मुलांना या शाळेकडे आकृष्ट करण्याची गरज असल्याचे मत जागरूक मतदारांनी व्यक्त केले.

कंटनेरमुक्त प्रभाग या घोषणेची अंमलबजावणी केल्यामुळे दैनंदिन कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न नागरिकांना भेडसावतो. त्यामुळे अनेक जण रस्त्यावरच कचरा टाकतात. प्रभागातील रस्त्यांवर जागोजागी कचरा पडलेला दिसतो, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली.

नगरसेवकांचे दावे

* करोना संकटामुळे गाडीखान्याच्या आधुनिकीकरणासाठी निधी देता आला नाही. तो यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मिळेल.

* अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण झाल्याखेरीज वाहतूक कोंडी सुटणे अशक्य

नगरसेवक

* विजयालक्ष्मी हरिहर

* आरती कोंढरे  * अजय खेडेकर

* सम्राट थोरात

प्रभागातील महत्त्वाची ठिकाणे

डॉ. कोटणीस दवाखाना (गाडीखाना), फुलवाला चौक, जैन मंदिर, लोहियानगर, अग्निशामक दलाचे मुख्यालय, खडकमाळ आळी, पंचहौद मिशन, महात्मा फुले वाडा, माशी आळी, कस्तुरे चौक, सरदार घोरपडे उद्यान

नागरिक म्हणतात

०चार नगरसेवक एकाच पक्षाचे असले तरी एकत्रित विचार करून प्रभागामध्ये विधायक विकासकामे झाली असे छातीठोकपणे म्हणणे धाडसाचे ठरेल. सुशीला नेटके नगरसेविका असताना प्रभागामध्ये झोपडपट्टी पुनर्विकासाची एक योजना झाली होती. त्यानंतर या विषयामध्ये गती देण्याला चारही नगरसेवक कमी पडत आहेत.

– रूपेश पवार

माशी आळी भागातील रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. मात्र, निविदा प्रक्रियेमध्ये अडकून पडल्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही, असे सांगण्यात येते. त्यामुळे या भागातील नागरिकांना त्रास होत आहे. कचऱ्याचे कंटेनर काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे कचरा ही येथील एक महत्त्वाची समस्या झाली आहे.

– योगेश नाईक

राजकीय प्रतिनिधी म्हणतात

प्रभागाचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशातून मतदारांनी चारही नगरसेवक एकाच पक्षाचे निवडून दिले. मात्र, मतदारांच्या विश्वासाला ते पात्र ठरले आहेत, असे दिसून येत नाही. केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी होत असली, तरी चौघांनी मिळून एकही विकासाची नवी योजना राबविली नाही. प्रभागामध्ये कचऱ्याची समस्या गंभीर आहे. घोरपडे उद्यानाची दुरवस्थाआहे.

– कमल व्यवहारे, काँग्रेस</p>

‘सर्वाची जबाबदारी म्हणजे कोणाचीच जबाबदारी नाही’ या उक्तीनुसार या प्रभागामध्ये एकाच पक्षाच्या चारही नगरसेवकांचे कामकाज चालते. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ठिकठिकाणी गतिरोधक उभारण्याचे काम केले आहे. बेकायदा बांधकामांना नगरसेवकच प्रोत्साहन देत आहेत. झोपडपट्टी पुनर्विकासाला गती मिळालेली नाही.

– स्मिता काची, काँग्रेस

लोकप्रतिनिधी म्हणतात

महात्मा फुले राष्ट्रीय स्मारक येथील विहिरीला जोडली गेलेली जलवाहिनी बदलण्यात आली आहे. प्रभागामध्ये ठिकठिकाणी सिमेंट काँक्रिटचे रस्ते करण्यात आले असून काही रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. नागरिकांना सोयी-सुविधा देण्याच्या उद्देशातून गेल्या चार वर्षांमध्ये २० कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत.

– विजयालक्ष्मी हरिहर, नगरसेविका

गाडीखाना वैद्यकीय केंद्राच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव करोना संकटामुळे निधीची कमतरता भासल्याने पूर्णत्वास जाऊ शकला नाही. यंदाच्या महापालिका अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद होईल.  काही भाग ‘गवनि’ (गलिच्छ वस्ती निर्मूलन) जाहीर न झाल्यामुळे तर, काही ठिकाणी न्यायप्रविष्ट बाबींमुळे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना गती मिळू शकली नाही हे वास्तव आहे. बिडी कामगारांना घर मिळवून देऊ.

– आरती कोंढरे, नगरसेविका

घोरपडे उद्यानामध्ये ड्राय टेक फाउंटन हे मुलांसाठी संगीताच्या तालावरील कारंजे साकारले आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट अंतर्गत ज्यांचे शिक्षण कमी झाले आहे अशांसाठी कौशल्यावर आधारित ५३ अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. गाडीखाना वैद्यकीय केंद्रामध्ये डायलेसिस उपचार केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत अनेकांना गॅस सिलिंडर देण्यात आले आहेत.

– अजय खेडेकर, नगरसेवक

प्रभागातील गेल्या ३० वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या मैलापाणी वाहिनी बदलण्याचे काम करण्यात आले आहे. घसेटी पुलाजवळील स्वामी समर्थ मंदिरासमोर म्युरल लाईट भिंत साकारण्यात आली आहे. पीएमसी कॉलनी पुनर्विकासाचा प्रश्न वर्षभरात मार्गी लावण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मोमीनपुरा कब्रस्तान येथील भिंत बांधण्यात आली असून या कब्रस्तानामध्ये ग्रंथालय साकारण्यात आले आहे.

– सम्राट थोरात, नगरसेवक

तक्रारींचा पाढा

*  प्रभागामध्ये कचऱ्याची समस्या

* रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत

* अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी

* झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रश्न अनिर्णीत