पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांपैकी खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. या धरणातून मुठा नदीपात्रात एक हजार ७१२ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मंगळवारी हे धरण ९८ टक्के भरलं होते. मात्र धरणक्षेत्रात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे बुधवारी धरण १०० टक्के भरले. खडकवासला धरण १०० टक्के भरल्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.

पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चारही धरणात संततधार पावसामुळे १९.४१ टीएमसी आणि ६६.५८ इतके टक्के धरणे भरली आहेत. खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने या धरणामध्ये १.९७ अब्ज घनफूट ( टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. अन्य धरणांपैकी टेमघर धरणात १.७० टीएमसी, वरसगाव धरणामध्ये ७.५१ टीएमसी, पानशेत धरणामध्ये ७.६२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या पानशेत, टेमघर, वरसगाव आणि खडकवासला या चारही धरणात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठयामध्ये वाढ झाली असून आज सकाळी चार ही धरणात मिळून १९.४१ टीएमसी आणि ६६.५८ इतके टक्के धरणं भरली आहेत. तर त्यापैकी खडकवासला धरण हे बुधवारी १०० टक्के भरले आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून काल दुपार पासून ४२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यास सुरुवात केली होती.

धरण क्षेत्रात संततधार सुरू असल्याने पाणी साठ्यात कमालीची वाढ होत आहे. त्यामुळे त्यामध्ये वाढ केली असून सध्या स्थितीला एक हजार ७१२ क्युसेक पाणी सोडले जात आहे. खडकवासला धरणामधून मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याने नदीकाठच्या रहिवाशांनी सावधानता बाळगावी, असा इशारा देण्यात आला आहे.