मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणातील पाणीसाठ्यात झपाटयाने वाढ होत आहे. खडकवासला धरणाची १.९८ टीएमसी इतकी क्षमता असून सद्यस्थितीला १.८० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेता सद्यस्थितीला २५० क्युसेकने कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून उद्या (सोमवार) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कालव्यातून २ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस शहरात हलक्या सरी बरसणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

पुणे शहराला पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरण परिसरात चांगला पाऊस होत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. या चारही धरणाची २८ टीएमसी पाणी साठ्याची क्षमता आहे. यंदा राज्यात मान्सूनने दमदार आगमन केले आहे. पुण्यात देखील समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याचे पाहावयास मिळत आहे. आज शहरासह धरण क्षेत्रात देखील पावसाने चांगलीच हजेरी लावली. खडकवासला ११ मिमी, पानशेत ४० मिमी, वरसगाव ४१ मिमी तर टेमघर ३६ मिमी पाउस पडला आहे. खडकवासला धरणात ९१.६ (१.८० टीएमसी), पानशेतमध्ये ७०.६४ टक्के (७.७५ टीएमसी), वरसगाव धरणात ४१.८८ टक्के (५.३७ टीएमसी) आणि टेमघर ४३.३१ टक्के (१.४० टीएमसी) पाणीसाठा आहे. या चारही धरणात सध्या १६.२९ टीएमसी पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.