खडकवासला धरणाच्या तीरावरील वनसंपत्तीवर समाजकंटकांनी घाला घातला असल्याचा आरोप ग्रीन थम्ब या पर्यावरणवादी संघटनेचे लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) सुरेश पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. या संदर्भात हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रीन थम्ब संस्थेतर्फे भूमाता चॅरिटेबल ट्रस्ट, त्रिशक्ती, परिवर्तन, रोटरी आणि लायन्स क्लब, सार्वजिनक बांधकाम विभाग, पुणे महापालिका, पुणे पोलीस आणि पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने लोकसहभागातून गेली १८ महिने खडकवासला धरणातील गाळ काढण्याचे काम करण्यात आले. धरणातील सुमारे ५० ते ६० हजार ट्रक माती काढण्यात आली आहे. या मातीच्या साहाय्याने मोठय़ा प्रमाणावर वृक्ष लागवड करून २० ते २५ हजार झाडांचे संवर्धन करण्यात आले आहे. रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी पुणेकर येथे येऊन श्रमदान करतात, असे सांगून पाटील म्हणाले, काही समाजकंटकांनी सरकारच्या या जमिनीवर अतिक्रमण केले आहे. या उपक्रमास विरोध करणाऱ्यांकडून रात्री झाडांची कत्तल करण्यात येते. लोखंडी सळई, तारा हे साहित्य चोरून नेणाऱ्या समाजकंटकांकडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले जात असून पर्यावरण चळवळीला अडथळा निर्माण केला जात आहे. यासंदर्भात ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांना निवेदन देण्यात आले असून हवेली पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदविली आहे.