News Flash

पिंपरीत खादी कपडय़ांच्या मागणीत वाढ

लोकसभा निवडणुकीच्या काळात मोदी लाट जोरात सुरू होती. त्यामुळे ‘मोदी जॅकेट’ला खूप मोठी मागणी होती.

महापालिका निवडणुकीचा फड रंगत चालला आहे. त्यामुळे एरवी सुटा बुटात वावरणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीसाठी खादीचे कपडे परिधान करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीचे वातावरण तयार झाल्यापासून खादीच्या कपडय़ांना शहरात मागणी वाढली असून गेल्या दोन महिन्यांपासून विक्रीमध्ये ४० टक्के वाढ झाली आहे.

महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून जाण्यासाठी सर्वप्रकारे तयार असलेल्या इच्छुकांनी प्रचार यंत्रणेपासून ते राहणीमानापर्यंतची सर्वच बाबींची तयारी केली आहे. त्यासाठी खास ‘इव्हेंट मॅनेजर्स’चीही मदत घेतली जात आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार बहुतांश इच्छुक उमेदवारांचा वावर सुरू आहे. मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी कोणते कपडे वापरावेत, केसरचना कशी असावी इथपासून नागरिकांशी संवाद, भाषण कसे असावे याचे मार्गदर्शन इच्छुक घेत आहेत. त्यामुळे एरवी मग्रुरीची भाषा करणारे काही इच्छुक खादीच्या पांढऱ्या शुभ्र कपडय़ांमध्ये मतदारांपुढे जाऊन नमस्कार करताना दिसत आहेत. त्यामुळे इच्छुकांकडून खादीच्या तयार कपडय़ांची मागणी वाढल्याने विक्रीमध्येही वाढ झाली आहे. खादी कापडाचा दर ९० रुपये मीटर पासून ते ४१० रुपये मीटपर्यंत आहे. खादी शिल्क ‘टसर’, ‘मटका’, ‘कटिया’, ‘बापटा’ आणि ‘रॉ सिल्क’चे खादीचे कापड ६१० रुपये मीटर या दराने बाजारात उपलब्ध आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात मोदी लाट जोरात सुरू होती. त्यामुळे ‘मोदी जॅकेट’ला खूप मोठी मागणी होती. मोदी जॅकेटला विधानसभा निवडणुकीच्या वेळीही मागणी होती. मात्र सध्या तेवढी मागणी नसल्याचे सांगण्यात आले. पिंपरी-चिंचवडमध्ये मोदी जॅकेटची मागणी एक-दोन दिवसाला एखादे जॅकेट इतकीच असल्याचे व्यवसायिकांनी सांगितले. मोदी जॅकेट्स ४८० रुपयांपासून ते ९०० रुपयांपर्यंत आहेत. तर वूलनचे जॅकेट दीड हजार रुपयांना आहे.

निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तशी खादीच्या कपडय़ाला मागणी वाढू लागली आहे. गेल्या महिनाभरापासून खादीच्या विक्रीमध्ये ४० टक्के वाढ झाली आहे. त्यात खादीचे तयार कपडे घेण्याकडेही ग्राहकांचा कल आहे.

– सिद्धार्थ जन्नू, व्यावसायिक, पिंपरी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 2:56 am

Web Title: khadi cloth demand increase in pimpri
Next Stories
1 ‘फलकबाजी’ची रणनीती
2 द्रुतगती मार्गावरील अपघातात सव्वा कोटींची भरपाई
3 सीमेवर लढणाऱ्या जवानांचे श्रेय राज्यकर्त्यांनी घेऊ नये
Just Now!
X