गेल्या वर्षभरापासून बंद असलेल्या मूळच्या ‘किबे लक्ष्मी थिएटर’ची नववर्षांरंभदिनी म्हणजे १ जानेवारीला ‘प्रभात’ होत आहे. मराठी चित्रपटांचे माहेरघर असा लौकिक असलेल्या या चित्रपटगृहाच्या दुसऱ्या खेळीचा नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘नटसम्राट’ने प्रारंभ होत आहे.
मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचा आठ दशकांचा मूक साक्षीदार असलेले प्रभात चित्रपटगृह गेल्या वर्षी २५ डिसेंबर रोजी बंद झाले. त्या घटनेला शुक्रवारी नाताळच्या दिवशी एक वर्ष पूर्ण झाले. ‘नटसम्राट’ या नाटकावर बेतलेल्या याच नावाच्या महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपटाने किबे लक्ष्मी थिएटरचा पडदा पुन्हा उघडला जाणार आहे, अशी माहिती अजय किबे यांनी दिली.
इंदूर येथील संस्थानिक सरदार रामचंद्र किबे यांच्या मालकीच्या या वास्तूमध्ये किबे लक्ष्मी थिएटर सुरू करण्यात आले होते. पुढे प्रभात फिल्म कंपनीने हे चित्रपटगृह चालविण्यासाठी घेतले. कंपनीचे ‘प्रभात’ हेच नावही या चित्रपटगृहाला दिले गेले. किबे आणि दामले यांच्यातील करार संपुष्टात आला. दामले यांना मूळ मालक किबे यांच्याकडे चित्रपटगृहाचा ताबा द्यावा लागला. चित्रपटगृह बंद केल्यानंतर पुढील कामांचा निपटारा करण्यासाठी २५ डिसेंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. नाताळची सुट्टी आणि पुन्हा केव्हा पडदा उघडला जाणार हे निश्चित माहीत नसल्यामुळे गेल्या वर्षी २५ डिसेंबर रोजी सर्व खेळ ‘हाऊसफुल्ल’ झाले होते. हे चित्रपटगृह पाडले जाऊन त्या जागेवर व्यावसायिक संकुल उभारले जाणार असल्याची चर्चा त्या वेळी रंगली होती. त्याविरोधात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि काही राजकीय पक्षांनी आंदोलन केले होते. मात्र, किबे कुटुंबीयांनी हे चित्रपटगृह स्वत:च चालविणार असल्याचे सांगत सर्व चर्चाना पूर्णविरामही दिला होता. मात्र, या चित्रपटगृहाचे ‘किबे लक्ष्मी थिएटर’ हे मूळचेच नाव कायम राहणार असल्याचेही किबे यांनी स्पष्ट केले होते.
नूतनीकरण केलेल्या किबे लक्ष्मी चित्रपटगृहामध्ये अत्याधुनिक ऑडिओ आणि व्हिडिओ उपकरणे, नवा पडदा, ‘बारको ४ के’चा प्रोजेक्टर अशा सुविधा बसविण्यात आल्या आहेत. या साऱ्याची चाचणीदेखील घेण्यात आली होती. ‘नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून लवकरच चित्रपटगृह सुरू होत आहे’, अशी पाटी चित्रपटगृहाबाहेर लावण्यात आली होती. मात्र, पोलिसांची परवानगी मिळत नसल्याने चित्रपटगृहाच्या दुसऱ्या खेळीचा आरंभ लांबला होता. आता पोलिसांची परवानगी मिळाली असून, गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांची अंतिम मान्यतेची सहीदेखील झाली असल्याने चित्रपटगृह सुरू करण्याचा मार्ग खुला झाला आहे. आता ‘नटसम्राट’ चित्रपटाच्या प्रदर्शनाने १ जानेवारीपासून किबे लक्ष्मी थिएटर पुणेकरांच्या सेवेमध्ये दाखल होत आहे.