छत्रपती संभाजीमहाराज यांच्या पराक्रमाची गाथा कथन करणारे ‘राजा शंभू छत्रपती’ हे पुस्तक २७ वर्षांनी नव्या स्वरूपात नव्या पिढीच्या वाचकांसमोर दाखल होत आहे. या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या माध्यमातून ‘शककर्ते शिवराय’चे लेखक शिवकथाकार विजयराव देशमुख यांनी वाचकांना नववर्षांची भेट दिली आहे.
विजयराव देशमुख यांच्या १९८९ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘राजा शंभू छत्रपती’ या पुस्तकाने शंभूराजांवरील किटाळ समर्थपणे दूर करून महाराष्ट्रामध्ये प्रभावी जागरण केले होते. त्याचा परिणाम म्हणून वडू कोरेगाव येथे शंभूराजांचा ३०० वा बलिदान दिवस शिवभक्तांच्या मोठय़ा उपस्थितीत साजरा झाला होता. तत्कालीन संरक्षणमंत्री के. सी. पंत, त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. संभाजीराजांच्या तेजस्वी चरित्राचा परिचय झाल्याने अवघ्या महाराष्ट्रात शंभूराजांची भव्य स्मारके उभारली गेली. हे प्रेरणादायी चरित्र नव्या पिढीसाठी पुन:प्रकाशित होत असल्याची माहिती नागपूर येथील छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजेय देशमुख यांनी दिली.
अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात शंभूराजांनी जे महान कार्य केले त्याची गाथा ‘राजा शंभू छत्रपती’ पुस्तकामध्ये कथन केली आहे. तब्ब्ल सात वर्षे मुघल साम्राज्याशी टक्कर देणाऱ्या शंभूराजांमुळे औरंगजेब दिल्लीला जाऊ शकला नाही. त्याची कबर महाराष्ट्रातच खोदावी लागली. पुस्तकाच्या नव्या आवृत्तीमध्ये संभाजीराजांनी रामसिंगला लिहिलेले पत्र समाविष्ट करण्यात आले आहे. ‘राजपूत आणि मराठे एक झालो तर, दिल्लीच्या तख्तावर बसण्याची औरंगजेबाची काय बिशाद’, असे शंभूराजांनी रामलिंगला पत्रामध्ये लिहिले होते. शंभूराजांचे अमरत्व पोहोचवावे या उद्देशातून हे लेखन केले असल्याचे विजयराव देशमुख यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 29, 2015 3:08 am