भारतामध्ये आढळून येणाऱ्या सुमारे ७० पक्ष्यांच्या आवाजाची कोणत्याही कृत्रिम साधनांशिवाय नक्कल करण्याचे कसब ज्येष्ठ पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांनी आत्मसात केले आहे. त्यापैकी काही पक्षी त्यांच्या आवाजाची नक्कल केल्यानंतर प्रतिसाद देतात, याची प्रचीतीही पुरंदरे यांनी घेतली आहे. पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल ऐकण्याबरोबरच पुरंदरे यांच्याशी संवाद साधण्याची संधी गुरुवारी १२ नोव्हेंबर रोजी सायं. ६ वाजता होणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ उपक्रमात मिळणार आहे.

निसर्ग आणि पर्यावरण क्षेत्रात गेल्या तीन दशकांपासून अभ्यासक, रक्षक, शिक्षक आणि लेखक म्हणून किरण पुरंदरे कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनातर्फे पुणे जिल्ह्य़ासाठी ‘मानद वन्यजीव रक्षक’ म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. प्राणी, पक्षी आणि जैवविविधता या विषयांवर पुरंदरे यांची बाराहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यापैकी, ‘आभाळवाटांचे प्रवासी’ आणि ‘सखा नागझिरा’ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा ‘उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार’ मिळालेला आहे. नागझिरा अभयारण्यात सलग ४०० दिवस मुक्काम करून त्यांनी तेथील पक्षिजीवनाचा अभ्यास केला आहे.

दिवाळीच्या थंडीची चाहूल लागताच राज्यातील पाणवठय़ांवर दरवर्षी पक्ष्यांचे स्थलांतर कसे होते, हजारो किलोमीटरचे अंतर पार करून पक्षी दरवर्षी त्याच ठिकाणी कसे येतात, या प्रश्नांसह पक्षी विश्वाबद्दलच्या माहितीचे भांडार पुरंदरे यांच्याशी होणाऱ्या गप्पांतून खुले होईल.

वनमहर्षी मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन (५ नोव्हेंबर) आणि ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली यांचा जन्मदिन (१२ नोव्हेंबर), या दोन्ही पक्षितज्ज्ञांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ५ ते १२ नोव्हेंबर हा ‘पक्षी सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हे औचित्य साधून ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’मध्ये पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांच्याशी गप्पांची मैफील आयोजित करण्यात आली आहे. पक्ष्यांच्या लकबी, त्यांचे खाणे आणि त्यांचा विहार याविषयी अभ्यासपूर्ण माहितीचा खजिना पुरंदरे यांच्याशी होणाऱ्या संवादातून उलगडेल.

सहभागासाठी :  https://tiny.cc/LS_SahajBoltaBolta_12Nov   येथे नोंदणी आवश्यक.