किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या अनुपस्थितीमध्ये किराणा घराण्याच्या गायकांनी स्वरमंचावरून सादर केलेल्या गायनाने ६७ व्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’ची रविवारी सुरेल सांगता झाली.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या प्रथेनुसार किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने महोत्सवाची सांगता होते. मात्र यंदा त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे गायनसेवा अर्पण करता आली नाही. त्यामुळे पं. भीमसेन जोशी यांच्या पं. उपेंद्र भट, पं. राजेंद्र कंदलगावकर, पं. सुधाकर चव्हाण, संजय गरुड, आनंद भाटे, श्रीनिवास जोशी आणि विराज जोशी या शिष्यांनी ‘जमुना के तीर’ ही भैरवी सादर करून महोत्सवाची सांगता केली. त्यांना सुयोग कुंडलकर यांनी संवादिनीची, भरत कामत यांनी तबल्याची,तर  नामदेव शिंदे आणि संदीप गुरव यांनी तानपुऱ्याची साथसंगत केली.

महोत्सवात रविवारच्या सत्रात अतुल खांडेकर, रुचिरा केदार या युवा कलाकारांसह किराणा घराण्याचे पं. उपेंद्र भट, चंद्रशेखर वझे आणि पतियाळा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. अजय चक्रवर्ती यांच्या गायनाची मैफील झाली. नीलाद्री कुमार यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सतारवादनाला विजय घाटे यांची समर्पक तबल्याची साथसंगत लाभली.

सलग दहा तासांच्या स्वराभिषेकामध्ये न्हाऊन निघालेल्या रसिकांनी पं. सवाई गंधर्व यांच्या गायकीचे सूर कानामध्ये साठवत एकमेकांचा निरोप घेतला तो २०२० मधील महोत्सवामध्ये भेटण्याचे आश्वासन देतच!

सतारीवर नवा राग..

नीलाद्री कुमार यांनी ‘तिलक कामोद’ आणि ‘नट’ या रागांच्या मिश्रणातून निर्मिती केलेला नवा राग सतारवादनातून सादर केला. हा राग प्रथमच या महोत्सवात सादर केला. पुणेकरांनी हिरवा झेंडा दाखविला म्हणजे या रागाला यश लाभेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.