पर्यावरण, वन्यजीवन, ऊर्जा, हवा आणि पाणी यासंदर्भातील प्रश्नांचा वेध घेणारा ‘किर्लोस्कर’ आणि ‘वसुंधरा क्लब’ यांच्यातर्फे १७ ते २५ जानेवारी या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिर आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे आठवा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत आहे. ‘रीडय़ूस’, ‘रीयूज’, ‘रीसायकल’ या तत्त्वांमध्ये ‘रीफ्यूज’ आणि ‘रीकव्हर’ या दोन तत्त्वांची भर घालून पाच ‘आर’ही आचरणात आणण्यास सोपी प्रणाली आणली आहे. यानिमित्ताने आयोजित छायाचित्र आणि चित्रपट स्पर्धेची ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे.
किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे अध्यक्ष माधव चंद्रचूड आणि संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पगमार्क्‍स, गो वाईल्ड, लोकायत आणि वन विभागाचे या महोत्सवास सहकार्य लाभले आहे. पुढील पिढय़ांसाठी ‘वसुंधरा वाचवा, तगवा आणि टिकवा’ हा संदेश देणारा महोत्ससव सध्या सहा राज्यांतील २८ शहरांमध्ये होत आहे.
छायाचित्र स्पर्धेसाठी ‘पर्यावरण माझ्या नजरेतून’ आणि ‘आशेचा किरण’ हे दोन विषय देण्यात आले असून गेल्या वर्षी ८५० छायाचित्रकारांनी ८ हजारांहून अधिक छायाचित्रे पाठविली होती. त्यापैकी सर्वोत्तम १५० छायाचित्रांचे प्रदर्शन सर्व शहरामंध्ये मांडण्यात येते. यंदा या स्पर्धेसाठी १० हजारांहून अधिक छायाचित्रे आली आहेत. तर, चित्रपट स्पर्धेसाठी व्यक्ती, संस्था, त्याचप्रमाणे रोटरी, लायन्स क्लब या माध्यमातूनही संघ सहभाग घेऊ शकतात. हा लघुपट ३० मिनिटांपर्यंतच असावा. ते मोबाईल तसेच व्हिडिओ कॅमेऱ्यावर चित्रित केलेले असावेत. मानवाचा पृथ्वीशी असलेल्या नात्याचा एक नवा पैलू प्रकाशात आणणारा हा लघुपट असावा एवढीच अपेक्षा आहे. या स्पर्धेमध्ये ३५ देशांतील स्पर्धकांचा सहभाग असेल. दोन्ही स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांच्या विजेत्यांसह उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धकांनी आपली छायाचित्रे  photovasundhara@gmail.com, vasundharaphoto2013@gmail.com या संकेतस्थळांवर पाठवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.