भारतातील सर्वात मोठे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘किसान’ कृषी प्रदर्शनाचे बुधवारी मोशी येथे दरवर्षीप्रमाणे प्रदर्शनाला आलेल्या शेतकऱ्यांमधील पहिल्या गटाच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हे प्रदर्शन रविवार (१५ डिसेंबर) पर्यंत सुरू राहणार आहे. प्रदर्शनात संशोधन संस्था, नवउद्योजक आणि सहाशेहून अधिक कंपन्या सहभागी झाल्या आहेत.

आज सकाळी नऊ वाजता प्रदर्शनासाठी आलेल्या पहिल्या शेतकरी गटातील आंध्र प्रदेशमधील श्रीकाकुलम जिल्ह्यातील सी.एच.आर. प्रसाद, उस्मानाबाद जिल्ह्य़ातील वाशी तालुक्यातील बाळासाहेब भांडवले, जालना जिल्ह्य़ातील अंबड तालुक्यातील नारायण देशमुख, सुभाष बोराडे, नितीन बोराडे, पांडुरग बोराडे, हणमंत बोराडे, बबन बोराडे आणि कागल तालुक्यातील अभिजित गंगाधरे, संभाजी पाटील, कुमार पवार, अशोक पाटील, प्रल्हाद पाटील आणि इतर शेतकऱ्यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

१५ एकर क्षेत्रावरील या प्रदर्शनात ६०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नवउद्योजक सहभागी झाले असून शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादने या प्रदर्शनामध्ये सादर करण्यात आली आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाला देशभरातून दोन लाखांपेक्षा अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. किसान प्रदर्शनाला कृषी मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्राच्या कृषी विभागाचे सहकार्य लाभले आहे.