22 April 2019

News Flash

आठ हजार शाळांना सरकारची ‘किशोर’ भेट!

राज्यातील जिल्हा परिषदांच्या २००१ नंतर सुरू झालेल्या आठ हजार ७२  शाळांना ‘किशोर’ मासिक नियमित भेट देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आतापर्यंत २००० सालापर्यंतच्या शाळांना हे

राज्यातील जिल्हा परिषदांच्या २००१ नंतर सुरू झालेल्या आठ हजार ७२  शाळांना ‘किशोर’ मासिक नियमित भेट देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आतापर्यंत २००० सालापर्यंतच्या शाळांना हे मासिक दिले जात होतेच, त्यामुळे राज्यातील सर्वच जिल्हा परिषद शाळांत ‘किशोर’ पोहोचणार आहे.

राज्य पाठय़पुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळातर्फे गेली ४७ वर्षे ‘किशोर’ मासिक प्रकाशित होते. या मासिकाने अनेक पिढय़ांचे बालपण समृद्ध केले आहे. सरकारकडून राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या ५३ हजार ५८५ शाळांना मासिक दिले जात होते. मात्र, २००१ नंतर सुरू झालेल्या शाळा या योजनेपासून वंचित होत्या. ही उणीव दूर करीत सरकारने २००१ नंतरच्या शाळांनाही हे मासिक देण्याचा निर्णय घेतला. आता किशोर ६१ हजार ६५७ शाळांमध्ये पोहोचणार आहे. त्यासाठी सरकार ४९ लाख ३२ हजार ५६० रुपये खर्च करणार आहे.

‘किशोर’चे संपादक किरण केंद्रे या निर्णयाचे स्वागत करताना म्हणाले की, ‘ग्रामीण भागांत अनेक शाळांत ‘किशोर’ पोहोचत नव्हते. शालेय स्तरावर ‘किशोर’ची लोकप्रियता मोठी आहे. शहरांतील  शाळांना अभ्यासेतर उपक्रमांसाठी बरेच पर्याय उपलब्ध असतात. मात्र, ग्रामीण भागांत ‘किशोर’ला पर्याय नसतो. अनेक शाळांत त्याचे सामूहिक वाचनही होते. सरकारचा हा निर्णय ‘किशोर’ला व्यापक करण्याबरोबरच अनेक मुलांचे बालपण समृद्ध होण्यासाठी महत्त्वाचा आहे.’

खप ७५ हजार..

राज्यभरातील शाळांबरोबरच मासिकाचे स्वतंत्र वर्गणीदारही आहेत. त्यांची संख्या जवळपास सुमारे १० हजारांहून अधिक आहे. राज्य सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे ‘किशोर’चा एकूण खप आता ७५ हजारांच्या घरात जाणार असल्याची माहिती संपादक किरण केंद्रे यांनी दिली.

First Published on August 25, 2018 1:45 am

Web Title: kishor magazine 2