चिक्कूसारखे दिसणारे, आत पोपटी रंगाचा गर आणि बारीक काळ्या बिया असलेले आकर्षक किवी फळ सध्या चांगलेच लोकप्रिय झाले आहे. हे किवीचे फळ आता चक्क वाईन स्वरूपात चोखंदळांच्या पेल्यात येणार आहे. न्यूझीलंडची खासियत असलेल्या या किवी फळांचे उत्पादन अरुणाचल प्रदेशात होणार असून त्यापासून वाईनचे उत्पादन मात्र पुण्यात होणार आहे.
नऱ्हे येथील ‘ऱ्हिदम वायनरी’त किवीची फळे आणि द्राक्षे एकत्र करून त्यापासून ही वाईन तयार होणार असून ती जुलैमध्ये ‘अरुण किवी’ या नावाने पुणे व मुंबईच्या बाजारपेठेत उतरवली जाणार आहे. या वायनरीने किवी फळांसाठी अरुणाचल प्रदेशच्या ‘हॉर्टिकल्चर मार्केटिंग अँड प्रोसेसिंग बोर्डा’शी करार केला आहे. ‘हिल क्रेस्ट फूड्स अँड बेव्हरेजेस’चे संचालक अकल्पित प्रभुणे आणि विपणन विभागाच्या प्रमुख विदिता मुंगी यांनी पत्रकार परिषदेत या विषयी माहिती दिली.
प्रभुणे म्हणाले, ‘‘देशातील वाईनच्या बाजारपेठेत ५ ते ७ टक्के हिस्सा फळांच्या वाईन्सचा आहे. आम्ही यापूर्वी स्ट्रॉबेरी आणि अननसाची वाईन बाजारात आणली असून गेल्या वर्षी पुणे आणि मुंबईत सुमारे ९ हजार लिटर वाईन विकली गेली. या विक्रीत ६० ते ७० टक्के वाटा स्ट्रॉबेरी वाईनचा, तर ३० ते ४० टक्के वाटा अननसाच्या वाईनचा आहे. फळांपासून बनवल्या जाणाऱ्या सर्व वाईन्समध्ये त्या-त्या फळाबरोबर द्राक्षे वापरली जातात. अरुणाचल प्रदेशात किवी फळांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होत असून त्यातील ४० ग्रॅमपेक्षा कमी वजनाची किवी फळे दर्जाने चांगली असूनही त्यांना मागणी नसते. ही लहान फळे आम्ही वाईनसाठी वापरतो. अरुणाचल सरकारच्या हॉर्टिकल्चर बोर्डाने या वाईन प्रकल्पासाठी २५ लाख रुपयांचे वित्तीय साहाय्य केले आहे.’’
किवीच्या वाईनमध्ये १२ टक्के अल्कोहोल असल्याचेही प्रभुणे यांनी सांगितले.
आंबा, पीच या फळांचीही वाईन बनणार
किवी फळानंतर आंबा आणि पीचच्या फळांची वाईन बनवण्याचा कंपनीचा विचार असल्याचे विदिता मुंगी यांनी सांगितले. यातील आंबा रत्नागिरीहून तर पीच फळे अरुणाचलमधून आणली जाणार आहेत, असेही त्या म्हणाल्या.