01 March 2021

News Flash

पुण्यात घरांसाठी मागणी वाढणार?

पुण्यातील घरांसाठी मागणी सध्या कमी झाली असली तरी येत्या सहा महिन्यांत त्यांत १५ टक्क्य़ांनी वाढ होईल असा अंदाज...

| July 31, 2015 03:30 am

पुण्यातील घरांसाठी मागणी सध्या कमी झाली असली तरी येत्या सहा महिन्यांत त्यांत १५ टक्क्य़ांनी वाढ होईल असा अंदाज स्थावर मालमत्ता क्षेत्रातील कंपनीने त्यांच्या अहवालात व्यक्त केला आहे. मात्र, ग्राहकांची पसंती ही परवडणाऱ्या घरांसाठीच अधिक असून आलिशान गृहप्रकल्पांमध्ये ७० टक्क्य़ांनी घट झाली असल्याचे दिसत आहे.
‘नाईट फ्रँक’ या स्थावर मालमत्ता क्षेत्रातील व्यावसायिक सल्लागार कंपनीने त्यांचा अर्धवार्षिक अहवाल नुकताच जाहीर केला. जानेवारी ते जून २०१५ या कालावधीतील पुण्यातील बांधकाम क्षेत्राबाबतची स्थिती आणि पुढील सहा महिन्यांचा अंदाज या अहवालात नमूद करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पुण्यात घरांसाठीची मागणी अद्यापही खूप वाढली नसली, तरी आता पुन्हा एकदा पुण्यातील घरांसाठीची मागणी वाढत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. पुढील सहा महिन्यांमध्ये नव्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये १५ टक्क्य़ांनी वाढ होईल, तर गृहखरेदीमध्ये ६ टक्क्य़ांनी वाढ होऊन ती २१ हजार ४४० घरांपर्यंत पोहचू शकेल. त्याचप्रमाणे मुंबई, दिल्लीच्या तुलनेत येत्या काळात पुण्यातील घरांसाठी मागणी वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या आलिशान गृहप्रकल्पांकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये पुण्यातील आलिशान गृहप्रकल्पांमध्ये ७० टक्क्य़ांनी घट झाली आहे. प्रती चौरस मीटर साधारण ४ हजार ५०० रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांसाठीची मागणी घटली आहे.
व्यावसायिक बांधकाम प्रकल्पांसाठी पुण्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात वाढलेली गुंतवणूक फायदेशीर ठरली आहे. कार्यालये, शोरूम्स यासाठीच्या रिकाम्या जागा पंधरा टक्क्य़ांनी कमी झाल्या असून त्यामध्ये सर्वाधिक मागणी ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांकडून दिसत आहे. त्यामध्ये येरवडा परिसराला उद्योगांकडून अधिक पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. येत्या सहा महिन्यात पुण्यातील व्यावसायिक जागांसाठी पुरवठय़ाच्या तुलनेत अधिक वाढ होईल, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. राज्याच्या करांमध्ये मिळालेली सूट आणि त्यामुळे वाढू लागलेली गुंतवणूक यामुळे कार्यालयीन किंवा व्यावसायिक जागांच्या मागणीत वाढ होईल, असे या अहवालात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 3:30 am

Web Title: knight frank home demand
टॅग : Demand
Next Stories
1 पुणे-कोल्हापूर रस्त्यावर थांबलेले ट्रक फोडून लाखोंचा माल लुटण्याचे प्रकार
2 देशातील काळ्या पैशांचे प्रमाण कमी करण्यासाठी चलनातील मोठय़ा नोटांचे प्रमाण कमी करावे – ‘अर्थक्रांती’ चळवळीची मागणी
3 पुणे- लोणावळा लोहमार्ग तिहेरीकरण प्रकल्पाला वेग
Just Now!
X