शुक्रवारपासून तीन दिवसांचा खाद्य महोत्सव रंगणार

कोल्हापूर आणि तेथील खाद्यसंस्कृती खवय्यांना नेहमीच आकर्षति करत असते. त्यामुळेच कोल्हापुरी खाद्यपदार्थाशी त्यांचे एक वेगळेच नाते निर्माण झाले आहे. हे नाते अधिक घट्ट व्हावे आणि खास कोल्हापुरी चव पुण्यातील खवय्यांनाही चाखता यावी यासाठी शुक्रवारपासून (२४ मार्च) पंडित फाम्र्स येथे तीन दिवस सकाळी दहा ते रात्री दहा या वेळात ‘कोल्हापुरी फूड फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे.

‘कोल्हापूर इटरिज’ या फेसबुक ग्रुपतर्फे या खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याविषयी माहिती देताना निखिल ठक्कर म्हणाले, खवय्यांसाठी खाणे हा समान धागा असतो. याच एका समान धाग्याने एप्रिल २०१६ पासून आम्ही फेसबुकच्या माध्यमातून जोडलो गेलो आहे. एका वर्षांतच आमची सदस्य संख्या ४० हजारांपर्यंत पोहोचली. या ग्रुपमध्ये पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि परिसर, बंगळूरू, गोवा, बेळगाव इतकेच नाही तर परदेशातील खवय्येसुद्धा आहेत. या माध्यमातून आम्हाला कोल्हापूरमधील खाद्यसंस्कृती पुन्हा एकदा नव्याने उलगडली आहे. ही खाद्यसंस्कृती आमच्यासारख्या आणखी खवय्यांपर्यंत पोहोचवावी या उद्देशातून आम्ही पुण्यात या खास ‘कोल्हापुरी खाद्य महोत्सवा’चे आयोजन करीत आहोत.

या  महोत्सवात कोल्हापूरमधील पद्मा गेस्ट हाउस, गावरान मिसळ, फडतरे मिसळ, हॉटेल म म मसूर, हॉटेल तांबडा पांढरा, अवंती वडा, नितीन्स कॅन्टीन, राजभाऊ भेळ यांचा सहभाग असेल. अस्सल चवीचा तांबडा-पांढरा रस्सा, खांडोळी, मटण लोणचे, मटण-चिकन थाळी, पिठलं भाकरी, अख्खा मसूर, मिसळ अशा खाद्यपदार्थाची चव खवय्यांना चाखता येणार आहे. कोल्हापुरी संस्कृतीचा अनुभव देणारी एक बाजारपेठ वसविण्यात येणार असून, कोल्हापूर आणि परिसरातील प्रसिद्ध खाद्यपदार्थासह इतर गोष्टी उपलब्ध असतील.