पुण्यातील कोंढवा येथे काल (शनिवार) पहाटेच्या सुमारास भिंत कोसळून १५ मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक विपुल अगरवाल आणि विवेक अगरवाल यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना आज (दि.३०) पुणे न्यायालयात आज हजर केले असता २ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

याप्रकरणी पोलिसांनी आल्कन स्टायलस लॅंडमार्कस या बांधकाम संस्थेच्या पाच भागीदार बिल्डर आणि अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यातील आरोपी जगदीशप्रसाद अग्रवाल (वय ६४), सचिन जगदीशप्रसाद अग्रवाल (वय ३४), राजेश जगदीशप्रसाद अग्रवाल (वय २७), विवेक सुनिल अग्रवाल (वय २१), विपुल सुनील अग्रवाल (वय २१) या पाच जणांबरोबर साईट इंजिनिअर, साईट सुपरवायझर, कंत्राटदार यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर, कांचन डेव्हलपर्स या बांधकाम संस्थेच्या तीन भागीदार पंकज व्होरा, सुरेश शहा आणि रश्मीकांत गांधी या तिघांसह त्यांचे साईट इंजिनिअर, साईट सुपरवायझर आणि मजुर पुरवणारा कंत्राटदार यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक विपुल अगरवाल आणि विवेक अगरवाल यांना अटक केली आणि पुणे न्यायालयात हजर केले.