कोरेगाव-भीमा प्रकरणात समस्त हिंदू आघडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर दगडफेकीस प्रवृत्त करणे आणि लोकांना चिथावणी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे सुद्धा आरोपी आहेत.

शिरूर तालुक्‍यातील कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी संपूर्ण राज्यातून हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी आले होते. त्यावेळी तेथे दगडफेक, जाळपोळ झाली होती. या प्रकरणात एकबोटे यांच्यावर अॅट्रॉसिटीच्या विविध कलमानुसार आणि भादंवि ३०७, १४३, १४३, १४८, १४९, २९५ (अ), ४३५, ४३५, शस्त्र कायदा ४, २५ नुसार गुन्हा दाखल आहे.

एकबोटेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होत असताना एकबोटेंच्या बाजूने त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. मात्र, त्याला प्रतिवाद करण्यासाठी राज्य सरकारकडून कोणत्याही सरकारी वकिलाला नियुक्त करण्यात आले नव्हते. मात्र दलित संघटनांनी त्यांच्या बाजूने वकील नियुक्त केले होते. दरम्यान, न्यायालयाने युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर मिलिंद एकबोटेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. एकबोटेंवर दाखल असलेला गुन्हा गंभीर असल्याने अटकपूर्व जामीन देता येत नाही, असेही न्यायालयाने यावेळी नमूद केले.