हवाई दलाच्या बेपत्ता झालेल्या विमानामध्ये निगडी येथील रहिवासी असलेले फ्लाईट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे या तरुण अधिकाऱ्याचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. २२ जुलैला चेन्नईहून पोर्ट ब्लेअरला जाताना हे विमान बेपत्ता झाले असून, त्याचा अद्यापही शोध लागलेला नाही. त्यामुळे कुणाल यांच्या कुटुंबीयांची अस्वस्थता वाढली आहे.
हवाई दलातील अंतोनोव्ह ३२ या विमानाने २९ जणांना घेऊन २२ जुलैला सकाळी आठच्या सुमारास चेन्नईच्या विमानतळावरून पोर्ट ब्लेअरला जाण्यासाठी उड्डाण केले होते. उड्डाण केल्यानंतर सोळा मिनिटांनी विमान बंगालच्या उपसागरावरून जात असताना त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. या विमानाचा शोध घेण्यासाठी हवाई दलाकडून युद्धपातळीवर मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, अद्यापही विमानाचा ठावठिकाणा लागलेला नाही.
फ्लाईट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे हे अवघ्या २८ वर्षांचे असून, हवाई दलाच्या विमानात नेव्हिगेटरची (दिशा दर्शक) जबाबदारी त्यांच्यावर होती. विमान बेपत्ता झाल्याचे वृत्त कुणाल यांच्या कुटुंबीयांना कळताच त्यांना धक्का बसला. कुणालचे मामा दिनेश पाटील हे हवाई दलाच्या संपर्कात आहेत. मात्र, अद्याप विमानाबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध होत नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. निगडी प्राधिकरणातील सिंधुनगर भागातील एलआयजी कॉलनीत बारपट्टे कुटुंबीय राहतात.
कुणाल बारपट्टे यांनी फग्र्युसन महाविद्यालयातून बीएससी इलेक्ट्रॉनिक ही पदवी घेतली असून, हैदराबाद येथील एअरफोर्स अ‍ॅकॅडमीत त्यांचे प्रशिक्षण झाले आहे. कुणाल यांचे वडील राजेंद्र बारबट्टे हे कासारवाडीजवळील केंद्रीय रस्ते वाहूतक संशोधन संस्थेतून निवृत्त झाले आहेत. सध्या बारपट्टे कुटुंबीयांकडून कुणाल यांच्या विवाहासाठी प्रयत्न करण्यात येत होते. दोन आठवडय़ांपूर्वी कुणाल हे घरी येऊन गेले होते.