केंद्रात गृहनिर्माण खात्यात सहसचिव या पदावर नियुक्ती झाल्यानंतर महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार कुणाल कुमार यांनी गेल्या आठवडय़ात सोडला. कुणाल कुमार यांची दिल्लीत नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या पुण्यातील कारकिर्दीबाबत अनेकविध प्रसंग आणि घटना चर्चेत येत राहिल्या. एखादी योजना किंवा एखादी संकल्पना एखाद्या अधिकाऱ्याने स्वत:ची मानली की तो अधिकारी ती योजना किती उत्तमप्रकारे यशस्वी करून दाखवतो, त्या योजनेसाठी तो कसा मनापासून प्रयत्न करतो याचे उत्तम उदाहरण कुणाल कुमार यांनी दाखवून दिले. स्मार्ट सिटी योजना त्यांनी स्वत:ची मानली आणि ती यशस्वी करण्यासाठी त्यांनी मन:पूर्वक सर्व ते प्रयत्न केले.

पुणे महापालिकेत आयुक्त म्हणून काम करताना कुणाल कुमार यांनी स्मार्ट सिटी योजनेसाठी सर्व स्तरांवर जे प्रयत्न केले ते निश्चितच पथदर्शी म्हणता येतील असे ठरले. आयुक्त म्हणून त्यांनी तीन वर्षे आणि साडेसात महिने काम केले. आयुक्त पदावर काम करणारे अधिकारी त्यांच्या कार्यकाळात एखादी योजना किंवा प्रकल्प आपला मानतात आणि त्याच्या यशस्वीतेसाठी ते सर्व प्रकारे प्रयत्न करतात. रत्नाकर गायकवाड आयुक्तपदी असताना त्यांनी झोपडपट्टय़ांमधील स्वच्छतागृहांचा विषय प्रभावीपणे हाताळला आणि त्या विषयात त्यांनी लक्षणीय कामगिरी करून दाखवली.

अधिकाऱ्याने एखादी योजना आपली मानून यशस्वी करुन दाखवण्याचे आणखी एक उदाहरण कुणाल कुमार यांच्या कामातून दिसले. ते ऑगस्ट २०१४ मध्ये आयुक्त म्हणून पुण्यात आले. स्मार्ट सिटी योजना त्यांनी स्वत:ची मानली आणि केंद्राच्या या योजनेत पुण्याची निवड व्हावी यासाठी त्यांनी सर्व ते प्रयत्न केले. स्मार्ट सिटी कशी असावी, त्यात कोणती कामे व्हावीत हे नागरिकांनी सुचवायचे होते. योजनेसाठी लोकसहभागाची अट होती. हा लोकसहभाग वाढवण्यासाठी कुणाल कुमार यांनी अनेक संस्था, संघटनांची मदत घेतली. त्यासाठी समाजमाध्यमांचा भरपूर वापर केला. तेव्हा केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार होते, पण महापालिकेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता होती. स्मार्ट सिटी प्रकल्पापासून मेट्रो प्रकल्पापर्यंत प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग प्राप्त झाला होता.

स्मार्ट सिटी योजनेतील प्रत्येक कार्यवाहीबाबत ते आग्रही राहिले होते. त्यामुळे योजनेच्या प्रत्येक टप्प्यावर पुणे महापालिका लक्षणीय कामगिरी करू शकली. या योजनेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले असे ते सातत्याने सांगत राहिले. त्यासाठी त्यांनी शहरात शब्दश: शेकडो बैठका घेतल्या. अनेक संस्थांमध्ये जाऊन तेथे त्यांनी ही योजना मांडली आणि सर्वाचे सहकार्य कसे मिळेल ते पाहिले. सर्व राजकीय पक्षांबरोबरही ते अशा विषयांबाबत सतत चर्चा करत राहिले. नागरिकांच्या शंकाचे, प्रश्नांचे निरसन करणे, सूचना ऐकून घेणे अशाही कार्यक्रमात ते सहभागी होत.

स्मार्ट सिटीच्या विषयात अनेकदा आयुक्त आरोपांच्या, टीकेच्या तडाख्यात सापडले. अर्थात हे सारे आयुक्तांनी अपेक्षित धरले होते, कारण अशा प्रत्येक वाद-विवादाच्या प्रसंगात त्यांनी मोठय़ा कौशल्याने मार्ग काढला. प्रसंगी थेट राज्य शासनाकडून आदेश आणण्यात ते यशस्वी झाले. टीकेला, आरोपांना त्यांनी फार महत्त्व दिले नाही. स्मार्ट सिटी हा विषय त्यांनी लावून धरला आणि योजनेच्या प्रत्येक टप्प्यावर दमदार कामगिरी करून दाखवली. स्मार्ट सिटी असो किंवा इतर योजना असोत ; सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. शहराच्या पातळीवर लोकप्रतिनिधी एखाद्या योजनेला वा प्रकल्पाला सहकार्य करत नाहीत असे लक्षात येताच विविध राजकीय पक्षांच्या राज्यस्तरीय नेत्यांशी चर्चा करून त्यांच्यामार्फत योजना मंजूर करून घेण्याचे कौशल्य त्यांनी दाखवले. पार्किंग धोरणाच्या बाबतीतही ते आग्रही होते. ते धोरणही वादग्रस्त ठरले, मात्र जे विषय त्यांनी स्वत:च्या आग्रहाचे केले ते पूर्णत्वास नेण्याच्या कामात कुणाल कुमार यांनी जी चिकाटी दाखवली ती निश्चित कौतुकास्पद अशीच होती.

मिळकत कराचा भरणा सुरू

नवे आर्थिक वर्ष सुरू झाल्यामुळे महापालिकेकडून मिळकत कर संकलन सुरू करण्यात आले आहे. या संकलनाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच आठवडय़ात नागरिकांचा उत्साही प्रतिसाद लाभला. मिळकत करापोटी पहिल्या आठवडय़ात ५२ कोटींचे उत्पन्न महापालिकेला प्राप्त झाले. चालू आर्थिक वर्षांतील देयकांचे वाटप महापालिकेने २७ मार्चपासून सुरू केले असून ४० टक्के देयकांचे वाटप पूर्ण झाले आहे. शहरात पाच लाख ५५ हजार मिळकतधारक असून ३१ मे पर्यंत कर भरल्यास पाच ते दहा टक्के इतकी सूट महापालिकेकडून दिली जाते.

पहिल्या सात दिवसात जो कर जमा झाला त्यात २९.४० कोटी इतकी रक्कम ऑनलाईन भरण्यात आली. भरणा करणाऱ्यांच्या एकूण प्रमाणात हे प्रमाण ६१.७४ टक्के आहे. उर्वरित २२.६३ टक्के भरणा रोख स्वरुपात आणि १५.०७ टक्के भरणा धनादेश स्वरुपात करण्यात आला. गेल्यावर्षी देखील ऑनलाईन भरणा करणाऱ्यांची संख्या अधिक होती. यंदाही त्यासाठी महापालिकेने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांकडून दरवर्षी मिळकत कर भरणा प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळतो. यंदाही पहिल्या आठवडय़ातील आकडेवारीने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.