‘‘महाराष्ट्रामध्ये पाण्याच्या दुष्काळामागे चांगल्या धोरणांचा दुष्काळ, शेतीच्या योग्य पद्धतींचा दुष्काळ असे अनेक दुष्काळ असून महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती ही नैसर्गिक नाही. चांगले नेतृत्व नसल्यामुळे महाराष्ट्राला दुष्काळाला तोंड द्यावे लागणार आहे,’’ असे मत ‘द हिंदू’ या वृत्तपत्राच्या ग्रामीण विभागाचे संपादक पी साईनाथ यांनी महात्मा फुले स्मृती व्याख्यानामध्ये सोमवारी व्यक्त केले.
पुणे विद्यापीठाचा सामाजिक शास्त्र विभाग आणि ज्योती मित्र मंडळ यांच्यातर्फे महात्मा फुले स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ‘शेतीतील समस्या आणि सामाजिक विषमता’ या विषयावर साईनाथ यांनी विचार व्यक्त केले. यावेळी साईनाथ म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील दुष्काळ हा मनुष्यनिर्मित आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात २१ नव्या गोल्फ कोर्सना परवानगी देण्यात आली. ज्यांना खूप मोठय़ा प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. पुरेसे पाणी उपलब्ध नसतानाही महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये उसाचे पीक घेतले जाते. पुण्यासारख्या ठिकाणी गुलाबांची लागवड केली जाते. पाण्याचे साठेही उद्योगजगताच्या हाती जात आहेत. महाराष्ट्राच्या चुकीच्या धोरणांचा आणि सक्षम नेतृत्वाचा परिणाम म्हणून आजचा दुष्काळ पाहावा लागतो आहे.’’
 शेतकऱ्यांची स्थिती सर्वात वाईट असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत, असे साईनाथ यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची स्थिती सर्वात वाईट आहे. १९९५ ते २०११ या कालावधीमध्ये महाराष्ट्रात २ लाख ७१ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी ५४ हजार शेतकरी हे फक्त महाराष्ट्रातील होते. यामध्ये आदिवासी, महिला असे आठ गट गृहित धरलेले नाहीत. ते गृहीत धरले तर हा आकडा दुप्पट होऊ शकतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल मोठय़ा प्रमाणात चर्चा व्हायला लागल्यानंतर त्या थांबवण्यापेक्षा आत्महत्यांचा आकडा कमी दाखवण्यासाठी आकडेवारीचे खेळ महाराष्ट्राने केले. कर्जमाफीचा लाभ गरज असलेल्या शेतकऱ्ऱ्यांना झाला नाही. कारण ही सिंचनाच्या आणि पाण्याच्या व्यवस्थेच्या गणितापेक्षाही जमिनीच्या आकारावर शेतकऱ्याची स्थिती ठरवली गेली आणि त्याप्रमाणे त्याला कर्जमाफी देण्यात आली. महाराष्ट्रातील सहकार चळवळ ही शेतकऱ्याच्या विकासासाठी पूरक होती, पण गेल्या वीस वर्षांमध्ये सहकारी क्षेत्राचेच खासगीकरण होत चालले असून सहकारी क्षेत्रावर काही कुटुंबांची मक्तेदारी झाली आहे. त्याचा सर्वाधिक वाईट परिणाम शेतकऱ्यांवर झाला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात ऊस उत्पादकांचा आणि बांधकाम व्यावसायिकांचा गट हा शक्तिशाली झाला आहे. सर्व धोरणे या गटांच्या फायद्यानुसार ठरत आहेत. त्याचे सर्वाधिक दुष्परिणाम हे शेतकऱ्यांवर होत आहेत. शेतकरी हे एकत्र येऊन त्यांच्या हक्कासाठी भांडू शकत नाहीत, हे त्यांच्या अवस्थेचे अजून एक कारण आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एखादी चळवळ उभी राहण्याची गरज आहे.’’