News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्योगक्षेत्रात मनुष्यबळाची कमतरता

टाळेबंदीचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर ४ मे पासून शहर परिसरातील उद्योगधंदे सशर्त परवानगीने सुरू झाले.

पिंपरी : उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडसह पंचक्रोशीतील औद्योगिक पटय़ात उद्योगधंदे सुरू होऊन महिन्याहून अधिक कालावधी उलटल्यानंतरही मनुष्यबळाची कमतरता ही समस्या उद्योगक्षेत्राला चांगलीच भेडसावते आहे. लहान, मोठय़ा कंपन्यांसह त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या सर्वच घटकांना याचा फटका बसतो आहे. सध्या कंपन्यांकडे कामच कमी आहे. आगामी काळात जेव्हा काम वाढलेले असेल, तेव्हा मनुष्यबळाची ही समस्याही गंभीर होईल, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

टाळेबंदीचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर ४ मे पासून शहर परिसरातील उद्योगधंदे सशर्त परवानगीने सुरू झाले. प्रारंभी कंपन्यांनी मर्यादित स्वरूपात काम सुरू केले. नंतर त्याची व्याप्ती वाढवण्यात आली. औद्योगिक मंदीमुळे आधीच कंबरडे मोडल्याप्रमाणे अवस्था असताना टाळेबंदीमुळे औद्योगिक क्षेत्राला जबर फटका बसला. सगळे अर्थकारण कोलमडले. मोठय़ा कंपन्या तसेच त्यांच्यावर अवलंबून असणारे सर्वच घटक यात भरडले गेले.

टाळेबंदीत खाण्या-पिण्याचे हाल होऊ लागल्याने हजारो कामगार, मजूर मिळेल त्या मार्गाने आपआपल्या गावी निघून गेले. तेथून ही समस्या सुरू झाली. थोडय़ाच दिवसात उद्योगधंदे पुन्हा सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले. मात्र, मोठय़ा अडचणींचा सामना करून गावाकडे गेलेल्या बहुतांश कामगारांची इतक्यात पुन्हा परत येण्याची मनस्थिती नव्हती. पुण्यामुंबईत काम करणारे कामगार एकीकडे परतत आहेत. मात्र, िपपरी-चिंचवडच्या औद्योगिक पट्टय़ात हे प्रमाण खूपच कमी असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्य़ाबाहेरील कामगार परतण्यास उत्सुक असतानाच परप्रांतात निघून गेलेल्या कामगारांची मात्र तशी मानसिकता नाही. त्यामुळेच कुशल, अकुशल कामगारांचा तुटवडा ही औद्योगिक पट्टय़ातील समस्या आहे. कंपन्यांकडे सध्या पूर्वीइतके काम नाही. त्यांच्यावर अवलंबून असलेले लघुउद्योग तसेच इतर घटकांची अवस्थाही तशीच आहे. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता तीव्रतेने जाणवत नाही. आणखी महिन्या-दोन महिन्यानंतर काम वाढू लागेल आणि परिस्थिती बदलेल, तेव्हा ही समस्या निश्चितपणे गंभीर स्वरूप धारण करेल, असे जाणकारांकडून सांगण्यात येते.

टाळेबंदीत कंपन्या आणि ठेकेदारांनी त्यांच्याकडील कामगारांकडे लक्ष दिले नाही. आता तो परतण्याच्या मन:स्थितीत नाही. दिवाळीपर्यंत कामगारांचा तुटवडा जाणवत राहील. उद्योगांना कुशल कामगारांची उणीव भासते आहे. कामगारासाठी कंपन्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

– दिलीप पवार, अध्यक्ष, श्रमिक कामगार महासंघ

मनुष्यबळाची कमतरता नक्कीच आहे. जुलैपासून काम वाढू लागेल, तेव्हा मनुष्यबळाची तीव्र अडचण जाणवेल. कामगारांना गावाकडून परत आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्य़ाबाहेरील कामगार परतू लागले आहेत. मात्र, परप्रांतातील कामगारांची मानसिकता तशी दिसत नाही.

– संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना

मनुष्यबळाची कमतरता ही उद्योगांपुढील मुख्य समस्या आहे. त्याअभावी कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. ग्राहकांची मागणी सध्या कमी आहे. कुशल कामगार उपलब्ध होत नसल्याने मिळेल त्या कामगारांच्या माध्यमातून काम पूर्ण करावे लागते. पूर्वीच्या तुलनेत कंपन्यांकडे सुमारे ६० टक्के काम कमी आहे. काही दिवसांत परिस्थिती सुधारू लागेल, अशी आशा वाटते.

– सुधीर मुंगसे, उद्योजक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 3:31 am

Web Title: lack of manpower in the industrial sector in pimpri chinchwad zws 70
Next Stories
1 करोनाबाधित रुग्ण, कुटुंबीयांबरोबर गैरवर्तन करू नका
2 ३० हजार परप्रांतीय पुण्यात
3 पणन मंडळाकडून यंदा प्रथमच जपानला आंब्याची निर्यात
Just Now!
X