News Flash

औषधे आणि अत्यावश्यक साहित्याचा तुटवडा

शासकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी येणारे रुग्ण निम्न आर्थिक स्तरांतील असतात.

‘मार्ड’ची तक्रार, रुग्णालय अधिष्ठात्यांकडून प्रतिसाद शून्य

पुणे : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये दैनंदिन वापराची औषधे आणि इतर अत्यावश्यक वैद्यकीय साहित्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागील दोन महिन्यांपासून हा तुटवडा जाणवत असून त्याबाबत महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांना वेळोवेळी निवेदन देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’ने केली आहे.
महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) तर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांमध्ये दैनंदिन वापराची महत्त्वाची औषधे आणि ग्लोव्ह्ज, सिरिंज, इंजेक्शनच्या सुया अशा अत्यावश्यक साहित्याचा तुटवडा आहे. शासकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी येणारे रुग्ण निम्न आर्थिक स्तरांतील असतात. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयातील उपचार परवडत नसल्यामुळे ते आमच्याकडे येतात. अशा परिस्थितीत इंजेक्शनची सिरिंज किंवा सुई त्यांनी बाहेरून आणून द्यावी हे सांगणे निवासी डॉक्टरांसाठी अत्यंत लाजिरवाणे आहे. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून पायाभूत सुविधा नसल्यामुळे व्यक्त होणाऱ्या नाराजी किंवा संतापालाही अनेकदा निवासी डॉक्टरांनाच सामोरे जावे लागते. ग्लोव्ह्जशिवाय उपचार करताना एचआयव्हीसारख्या रक्तातुन संक्रमण होणाऱ्या आजारांचा धोका असतो. रुग्णालय अधिष्ठातांकडे वेळोवेळी याबाबत तक्रार करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सरकारचे लक्ष वेधून घेत असल्याचे मार्डने म्हटले आहे.
सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे पाटील म्हणाले, पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे ससुन रुग्णालय आणि लातूर येथील विलासराव देशमुख गव्हर्नमेंट इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे रुग्णालय ही दोन रुग्णालये सोडल्यास राज्यात सर्वत्र हा तुटवडा आहे. तेथील निवासी डॉक्टरांनी औषधे आणि अत्यावश्यक साधनांशिवाय रुग्णांवर उपचार कसे करायचे? ही परिस्थिती म्हणजे ढाल-तलवारीशिवायच सैन्याने लढाईला जाण्यासारखे आहे. सरकार आणि आरोग्य विभागाने तातडीने याबाबतीत लक्ष घालावे अशी मागणीही डॉ. ढोबळे पाटील यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 1:14 am

Web Title: lack of medicines and essential supplies akp 94
Next Stories
1 ‘सहाच्या आत घरात’मुळे पुण्यात कोंडी..
2 राज्यात पुन्हा तापमानवाढीची शक्यता
3 Coronavirus – पुण्यात दिवसभरात ५ हजार ७२० करोनाबाधित वाढले, ३५ रूग्णांचा मृत्यू
Just Now!
X