पुण्यात टाळेबंदीच्या पहिल्याच दिवशी ‘काळा दिवस’

पुणे : शहरातील करोना रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना सर्वत्र नन्नाचा पाढा ऐकायला लागत आहे. रुग्णांना रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका नाहीत, दाखल होण्यासाठी खाटा नाहीत, गंभीर रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग आणि कृत्रिम श्वसनयंत्रणा सज्ज खाटा नाहीत, गरजूंना रेमडेसिविर नाही आणि सर्व सुटीचे दिवस लसीकरण सुरू ठेवायचा आटापिटा के ल्यानंतर लस घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना लसही नाही, असे चित्र शनिवारी शहरात पाहायला मिळाले. त्यामुळे टाळेबंदीचा पहिलाच दिवस पुणेकरांसाठी काळा दिवस ठरला.

शहरातील दुसऱ्या लाटेचे चित्र दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवार कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. शहरात औषधांची दुकाने वगळता हा बंद यशस्वी झाला, मात्र त्याचवेळी रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक, तसेच लस घेण्यास बाहेर पडलेले नागरिक यांना सर्वच आघाड्यांवर गैरसोयीला तोंड द्यावे लागले. शनिवारी शहरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सज्ज, अतिदक्षता विभाग, कृत्रिम श्वसन यंत्रणा सज्ज खाटाच उपलब्ध नसल्याचे दिसून आले. त्यामुळे अक्षरश: सैरभैर होण्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. अनेक लसीकरण केंद्रांवर लशीच्या पुरेशा मात्रा न पोहोचल्याने लस घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांनाही लस न घेताच परत यावे लागले.

शहराच्या बाहेरील भागात ऑक्सिजन सज्ज तसेच कृत्रिम श्वसन यंत्रणा सज्ज खाटा उपलब्ध असल्याचे माहितीफलक (डॅशबोर्ड) दाखवतो आहे, मात्र शहरातील रुग्णालयांमध्ये खाटा शिल्लक नाहीत. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची खाट मिळवण्यासाठी पायपीट सुरू आहे. रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णालयांनीच द्यावे असा नवीन आदेश आहे, मात्र आम्हाला ते अद्याप मिळत नसल्याने आम्ही रुग्णांना ते कसे द्यायचे हा प्रश्न आहे. खाट किं वा इंजेक्शन नाही असे सांगून रुग्णांचा रोष आम्ही ओढवून घेत आहोत, मात्र आमचा नाईलाज आहे, अशी भावना अनेक डॉक्टरांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’ कडे व्यक्त के ली. तसेच, नागरिकांनीही लक्षणे दिसताच तातडीने आपल्या फॅ मिली डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार सुरू करावेत, त्यामुळे गुंतागुंत रोखण्यास मदत होईल असे आवाहनही नागरिकांना के ले.

खाटेसाठी इथे माहिती तपासा, संपर्क  साधा

करोना रुग्णांसाठी खाट मिळवण्यासाठी पुणे महापालिके ने सुरू के लेल्या मदत क्रमांकांवर संपर्क  साधा. त्यावर रुग्णाचे नाव, पत्ता, वय, करोना अहवाल, ऑक्सिजन पातळी, रुग्णाला असलेले इतर आजार यांची माहिती द्या. त्यानंतर खाट उपलब्ध झाल्यास या क्रमांकावरून तुम्हाला कळवले जाईल, असे आवाहन महापालिका आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. मदतीसाठी ०२०-२५५०२१०६/१०७/१०९ या क्रमांकांवर संपर्क  साधावा. तसेच, ‘पुणे कोविड डॅशबोर्ड’ या संके तस्थळावर ‘बेड मॅनेजमेंट’ विभागात जाऊन रुग्णालये आणि तेथील उपलब्ध खाटांची माहिती घेता येईल.