शहरातून उरुळी आणि फुरसुंगी येथे कचरा वाहून नेणाऱ्या गाडय़ांमधील कचरा उडून रस्त्यावर पडू नये तसेच कचऱ्यातील दरुगधीयुक्त पाणी वाहनातून सांडू नये यासाठी बसवण्यात आलेल्या यंत्रणेत महापालिकेत गैरप्रकार झाल्याची लेखी तक्रार बुधवारी आयुक्तांकडे करण्यात आली. बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे या यंत्रणेत पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची ही तक्रार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका पुष्पा कनोजिया यांनी ही तक्रार केली आहे. त्यासंबंधीची माहिती त्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. कचरा मोठय़ा प्रमाणावर वाहून नेण्याचे काम ज्या गाडय़ा करतात, त्या प्रवासात असताना त्यातील कचरा वाऱ्याने इतस्तत: पसरतो आणि दरुगधीही पसरते. त्याबरोबरच या कचऱ्यातून दरुगधीयुक्त पाणी बाहेर येते व तेही वाहनातून सांडते.
या प्रकारांबाबत स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने केली होती. तसेच वाहने अडवणे, हवा सोडणे, गाडय़ा फोडणे असेही प्रकार वेळोवेळी झाले होते. त्यावर उपाय म्हणून गाडय़ा बंदिस्त करणे तसेच जे दरुगधीयुक्त पाणी सांडते ते बंद करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे दरवाजे गाडय़ांना बसवणे यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. लाखो रुपये खर्च करून हे काम करून घेण्यात आले. मात्र गाडय़ा बंदिस्त करण्याचे काम पूर्णत: अपयशी ठरले व त्यात अनेक त्रुटी देखील राहिल्या. त्यानंतर ही यंत्रणाच गाडय़ांवरून काढून टाकण्यात आली. संपूर्ण यंत्रणा निरुपयोगी झाल्यानंतरही हा निर्णय परिस्थितीनुरुप घेण्यात आला, असा दावा संबंधित खात्याने केला आहे.
ही यंत्रणा गाडय़ांवर बसवण्यात आल्यानंतर लगेचच निष्कामी व खराब झाली. मग प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा तपासून का घेण्यात आली नव्हती तसेच या यंत्रणेसाठी राबवण्यात आलेली निविदा प्रक्रियाही संशयास्पद होती, अशी कनोजिया यांची तक्रारोहे. ही यंत्रणा योग्यप्रकारे खातरजमा करून बसवली गेली असती, तर महापालिकेचे पंचाण्णव लाख रुपये वाचले असते, असेही कनोजिया यांचे म्हणणे असून जी यंत्रणा आठ दिवसही वाहनांवर टिकू शकली नाही, त्या यंत्रणेत नागरिकांच्या लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. व्हेईकल डेपोतील बेजबाबदार व भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे हे नुकसान झाले आहे. ही वसुली संबंधितांकडून झाली नाही, तर मनसेला रस्त्यावर उतरावे लागेल, असाही इशारा कनोजिया यांनी दिली आहे.