22 July 2019

News Flash

‘अ‍ॅप’वर पावणेचार लाख तिकिट विक्री

केंद्र शासनाच्या रोकडविरहित आणि कागदविरहित व्यवहाराच्या धोरणाच्या अनुषंगाने पुणे रेल्वेने पुढाकार घेऊन विविध उपक्रम राबविले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

अनारक्षित रेल्वे तिकिटांच्या दरांत सूट; पुणे विभागातील सुविधेला प्रवाशांचा प्रतिसाद

रेल्वेची अनारक्षित तिकिटे मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून काढून ‘आर-वॉलेट’च्या माध्यमातून रकमेचा भरणा केल्यास तिकिटावर पाच टक्के सूट देण्यात येत आहे. रेल्वेच्या पुणे विभागात देण्यात आलेल्या या सुविधेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, ही योजना सुरू केल्यापासून पावणेचार लाख प्रवाशांनी मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून तिकिटे काढून तिकीट दरावर सूट मिळविली आहे.

केंद्र शासनाच्या रोकडविरहित आणि कागदविरहित व्यवहाराच्या धोरणाच्या अनुषंगाने पुणे रेल्वेने पुढाकार घेऊन विविध उपक्रम राबविले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी मोबाइल ‘यूटीएसअ‍ॅप’च्या माध्यमातून रेल्वेची अनारक्षित तिकिटे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. सुरुवातीला पुणे विभागातील उपनगरीय स्थानकांसाठी, तर त्यानंतर सर्वच स्थानकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुविधा सुरू झाल्यापासूनच प्रवाशांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. प्रवाशांचा प्रतिसाद आणखी वाढविण्याच्या दृष्टीने गेल्या आठवडय़ापासून रेल्वेकडून याबाबत जनजागृतीही सुरू करण्यात आली आहे. स्थानकावर प्रवाशांना एकत्रित करून मोबाइल अ‍ॅपचे प्रात्यक्षित दाखविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे याबाबतच्या पत्रकांचेही वाटप करण्यात येत आहे.

मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून अनारक्षित तिकीट काढता येत असल्याने प्रवाशांना आता रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीच्या रांगेत थांबण्याची आवश्यकता नाही. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी गुगल प्ले स्टोअर, विंडो स्टोअर, अ‍ॅपल स्टोअर आदींच्या माध्यमातून ‘यूटीएसअ‍ॅप’ डाउनलोड करता येते. त्यावर नोंदणी करून प्रवाशांना ते वापरता येते. रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तिकिटांची रक्कम आरवॉलेटच्या माध्यमातून भरल्यास पाच टक्के सूटही देण्यात येत आहे.

इतर माध्यमातून तिकिटांची रक्कम भरल्यासही काही प्रमाणात सूट देण्यात येत आहे. जवळपास सर्वच प्रवाशांकडे सध्या इंटरनेटची सुविधा असलेला मोबाइल आहे. प्रामुख्याने उपनगरीय रेल्वे वाहतुकीत प्रवास करणाऱ्यांमध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणी आणि नोकरदारांची संख्या मोठी आहे.

या प्रवाशांकडून सध्या मोबाइल अ‍ॅपच्या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या सेवेचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घेऊन तिकीट खिडकीच्या रांगेत थांबण्याचे टाळावे, असे आवाहन पुणे रेल्वेकडून करण्यात आले आहे.

अ‍ॅपवरील तिकिटाचा वापर कसा?

रेल्वेची अनारक्षित तिकिटे काढण्यासाठी ‘यूटीएसअ‍ॅप’उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अ‍ॅपची नोंदणी केल्यानंतर रेल्वे स्थानकाची इमारत किंवा लोहमार्गापासून दोन किलोमीटरच्या अंतरावरून तिकीट काढता येते. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचतो. प्रवासादरम्यान तिकीट तपासणीसांना मोबाइलवर येणारी तिकिटाची प्रतिमा दाखवावी लागते. अ‍ॅपमधील ‘शो टिकीट’ या पर्यायामध्ये इंटरनेट सुरू नसतानाही तिकिटाची प्रतिमा दाखविणे शक्य आहे. या सुविधेतून तिकीट हरविण्याचीही भीती नाही.

First Published on March 14, 2019 12:58 am

Web Title: lakhs of tickets sold on r wallet app