४२ हेक्टर खासगी जागेची थेट खरेदी

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी – पीएमआरडीए) पहिल्या टप्प्यात करण्यात येणाऱ्या वर्तुळाकार रस्त्याच्या भूसंपादनाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. हवेली तालुक्यातील पाच गावांमधील ४२ हेक्टर खासगी जागा थेट खरेदीद्वारे ताब्यात घेण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पीएमआरडीएकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता.

पुणे-सातारा महामार्ग ते नगर महामार्ग यांना जोडणाऱ्या वर्तुळाकार रस्त्याचे काम हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यातील रस्त्याचे काम पीएमआरडीएकडून सुरू करण्यात आले आहे. वर्तुळाकार रस्त्याच्या पहिल्या टप्प्यासाठी हवेली तालुक्?यातील पाच गावांमधील साडेचार किलोमीटर जागेसाठी ४२ हेक्?टर जागेची आवश्यकता आहे. या जागेचा भूसंपादनाचा प्रस्ताव पीएमआरडीएकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार भूसंपादनाचे आदेश जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी काढले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पीएमआरडीएकडून वर्तुळाकार रस्ता करण्यात येणार आहे. हा रस्ता १२८ कि.मी.चा असून रुंदी ११० मीटर आहे. पहिल्या टप्प्यात आंबेगाव खुर्द ते वाघोली असा ३३ कि.मी.चा रस्ता होणार आहे. यामधील सोळा किलोमीटर रस्त्याची जागा पीएमआरडीएच्या ताब्यात आली आहे. तर पिसोळी, निंबाळकरवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द या पाच गावांमधील ४२ हेक्?टर जागेच्या भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता. यामध्ये कोणत्या गावातील किती जमिनीची आवश्यकता आहे, त्याचे गट क्रमांक आणि भूसंपादन करण्यात येणारे क्षेत्र याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आली आहे. त्यानुसार भूसंपादनाचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी दिली.

वर्तुळाकार रस्त्यासाठी पीएमआरडीएकडून नगररचना योजना (टाऊन प्लॅनिंग-टीपी स्कीम) हे प्रारूप राबवण्यात येणार आहे. नगररचना योजनेच्या माध्यमातून वर्तुळाकार रस्त्यासाठी जागा उपलब्ध होणार असून, काही जागा यापूर्वीच पीएमआरडीएच्या ताब्यात आल्या आहेत. तर उर्वरित जागा भूसंपादन करून ताब्यात घेतल्या जाणार आहेत. भूसंपादन करण्यात येणारी ४२ हेक्टर जागा ही खासगी मालकीची आहे. ही जमीन खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदीने ताब्यात घेतली जाणार आहे. जिल्हा प्रशासन संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करून भूसंपादनाचा मोबदला ठरवणार आहे. जिल्हा प्रशासनाने ही जागा ताब्यात घेतल्यानंतर ती पीएमआरडीएकडे हस्तांतरित केली जाणार आहे, असेही राम यांनी सांगितले आहे.