येरवडा येथील सव्वालाख चौरसफुटांचा भूखंड दि बिशप स्कूलला देण्याबाबत नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी यांनी घेतलेल्या आक्षेपांबाबत ‘आम्ही शासनाला फक्त वस्तुस्थिती कळवली आहे. शासनाकडून प्राप्त पत्रानुसार ही माहिती कळवण्यात आली असून महापालिका प्रशासनाने स्वयंस्फूर्तीने कोणताही प्रस्ताव शासनाला सादर केलेला नाही,’ असा दावा आयुक्तांनी केला आहे.
येरवडा परिसरातील भूखंड क्रमांक ७९ हा माध्यमिक शाळेसाठी आरक्षित भूखंड एका शिक्षण संस्थेला बहाल करण्यासाठी महापालिका आयुक्त मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कर्णे गुरुजी यांनी बुधवारी केला होता. संबंधित संस्थेशी आयुक्तांचे हितसंबंध निर्माण झाल्यामुळे या प्रकरणात आयुक्त महापालिकेचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान करत असल्याचे पत्रही मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.
आयुक्तांबाबत केलेल्या या तक्रारीबाबत भूसंपादन विभागाच्या उपायुक्तांनी प्रसिद्धिपत्रक दिले असून या प्रकरणाचा अहवाल प्रशासनाने स्वत:हून पाठवला नसल्याचे तसेच शासनाची दिशाभूल केली नसल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. जागा देण्यासंबंधीचा निर्णय मुख्य सभेने ज्या दिवशी घेतला होता त्या दिवशी सभाच झाली नव्हती, अशी तक्रार कर्णे गुरुजी यांनी केली आहे. त्याबाबत ती केवळ टंकलेखनातील चूक असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
ही जागा शिक्षण संस्थेला देताना चालू बाजारमूल्याचा विचार करूनच ती देण्यात यावी, असा स्पष्ट ठराव मुख्य सभेने २२ एप्रिल २०१३ मध्ये केलेला असतानाही त्याबाबत मात्र प्रशासनाकडून राज्य शासनाला कळवण्यात आलेले नाही. या संबंधीचा अहवाल शासनाला सादर करताना तसेच प्रशासनाची बाजू मांडताना याबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. या विषयासंबंधी शासनाकडे सुधारणांबाबत सुधारित अहवाल सादर करण्यात येईल असेही या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.