जमिनीची मोजणीही आता ऑनलाईन पद्धतीने केली जाणार असून १ ऑगस्टपासून राज्यात या मोजणी प्रक्रियेला सुरूवात होईल. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली.
नोंदणी व मुद्रांक विभाग आणि राष्ट्रीय सूचना केंद्रातर्फे नांदेड टाऊनशिप येथे सदनिका विक्री करारनाम्यांच्या ‘ई-नोंदणी’ प्रणालीचे उद्घाटन थोरात यांच्या हस्ते गुरूवारी करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. सदनिका विक्री करारनाम्यांच्या ई- नोंदणीमुळे घर घेणाऱ्या ग्राहकांचा वेळ वाचेल, असे सांगून थोरात यांनी जमिनीची मोजणीही आता ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘ग्रामीण भागात जमिनीची मोजणी करण्याची प्रक्रिया पूर्वी वेळखाऊ होती. परंतु मुळशी तालुक्यात जमिनीची मोजणी ऑनलाईन पद्धतीने करण्याचा पथदर्श प्रकल्प राबवण्यात आला. यात जमिनीचा सातबारा, अकृषिक परवाने या सर्व गोष्टींचे डिजिटायझेशन करण्यात आले. या पद्धतीने मोजणी करण्यात सुलभता असल्यामुळे गैरव्यवहारालाही आळा बसेल.’’
महापौर चंचला कोद्रे, नोंदणी महानिरीक्षक श्रीकर पदरेशी, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, शिक्षण आयुक्त एस. चोक्कलिंगम, जमाबंदी आयुक्त चंद्रकांत दळवी, राष्ट्रीय सूचना केंद्राच्या उपमहासंचालक स्वाती सरदेसाई, आमदार भीमराव तापकीर, नांदेड सिटीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर, कॅनरा बँकेचे कार्यकारी संचालक पी. एस. रावत या वेळी उपस्थित होते.