जलसंपदा विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी चांगला गृहप्रकल्प व्हावा, त्यासाठी आपल्या खात्यातील जागा देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांनी दिले.
महाराष्ट्र पाटबंधारे कर्मचारी कल्याण केंद्राच्या ‘जलदूत’ या मासिकाचे प्रकाशन व कर्मचाऱ्यांच्या गुणवंत मुलांचा सत्कार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. केंद्राचे संस्थापक व्यंकटराव गायकवाड, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक शिवाजीराव उपासे, मुख्य अभियंता अविनाश सुर्वे, दीपक मोडक, अधिक्षक अभियंता ए. ए. कपोते. ईश्वर चौधरी, विजय घोगरे, केंद्राचे सचिव रमेश आगावणे आदी त्या वेळी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, की पुण्यासारख्या शैक्षणिक संधी असलेल्या भागामध्ये कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी गृहप्रकल्प गरजेचा आहे. आपल्या खात्याच्या जागांवर अतिक्रमणे होत असतात. त्यापेक्षा या जागा अशा गृहप्रकल्पासाठी देण्याचा निर्णय घेऊ. त्याबाबत मी हे सूतोवाच करीत आहे, मात्र पुढील काम अधिकाऱ्यांना करायचे आहे. त्यात काही अडचण आली, तर मी लक्ष घालेन.