साखळीचोरटय़ांनी लांबविलेले दागिने काही सराफ व्यावसायिक विकत घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. पुण्यासह राज्याच्या विविध शहरात चोरटय़ांकडून दागिने विकत घेणाऱ्या सराफ व्यावसायिकांवर पोलिसांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साखळी चोरटय़ांकडून दागिने विकत घेणाऱ्या सराफांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
पुण्यासह संपूर्ण राज्यात साखळी चोरटय़ांनी घातलेल्या उच्छादाच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी साखळीचोरटय़ांना रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. परराज्यातही साखळीचोरटे दागिने हिसकविण्याचे गुन्हे करतात. त्यामुळे पुणे पोलिसांनी पुढाकार घेऊन दर तीन महिन्यांनी राज्य तसेच परराज्यातील पोलिस अधिकाऱ्यांसाठी सम्नवय बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या बैठकीत कर्नाटक पोलिसांचे पथक सहभागी झाले होते. पुणे पोलीस आयुक्तालयात मंगळवारी समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यासह विविध शहरांमधील वरिष्ठ पोलीस आधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.
पुण्यात साखळीचोरीचे गुन्हे केल्यानंतर चोरटे छोटय़ा शहरांमधे जाऊन तेथील सराफांना दागिने विकतात. पुणे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केलेल्या साखळी चोरटय़ांनी बार्शीतील सराफ व्यावसायिकाला दागिने विकल्याचे निष्पन्न झाले होते. त्यादृष्टीने पोलिसांनी यापुढील काळात चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या सराफांवर नजर ठेवण्याचा निर्णय घेतला. दागिने विकत घेणाऱ्या सराफांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी सांगितले. चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या सराफांवर कारवाई करण्याचे आदेश या बैठकीत पोलीस आयुक्त शुक्ला यांनी दिले, तसेच सराईत साखळी चोरटय़ांची छायाचित्रे आणि त्यांची माहिती अन्य शहरांमधील पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली.
गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांची सदिच्छा भेट
गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी मंगळवारी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी पुण्यातील राजकीय कार्यकर्त्यांवरील दाखल असलेले खटले आणि मागे घेण्यात आलेल्या खटल्यांची माहिती रणजित पाटील यांनी घेतली. १८६ खटले मागे घेण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती पाटील यांना देण्यात आली.