करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा धोका देखील वर्तवलेला आहे. असे असूनही आज रविवारची सुट्टी असल्याने पर्यटकांनी लोणावळा परिसरात एकच गर्दी केली होती. एकीकडे करोनाचा धोका कायम आहे. तर, दुसरीकडे मात्र पर्यटक बेभान होऊन पर्यटन करत आहेत.  लोणावळ्यात आज टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, भुशी धरणसह इतर ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पाहण्यास मिळाली.  जुन्नर येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा कार्यक्रम असल्याने त्यांच्या बंदोबस्तासाठी लोणावळा पोलीस गेले होते. परिणामी पर्यटनस्थळी बंदोबस्तच नव्हता, याची पर्यटकांनी संधी साधल्याचे दिसून आले.

पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यटनस्थळी नागरिकांनी गर्दी करू नये, असे वारंवार आवाहन केलेले आहे. परंतु, नागरिकांवर मात्र याचा काही परिणाम होताना दिसत आहे.

लोणावळा शहरातून जात असताना नेहमी रायवूड चौकी येथे पोलिसांचा फौजफाटा दिसत असतो. आज मात्र चौकीत एकही कर्मचारी नसल्याने पर्यटकांच्या गाड्या तेथून सुसाट जात होत्या. तसेच, सहारा ब्रिज येथे नागरिकांनी गाड्या थांबवून विनामास्क पर्यटनाचा आनंद देखील घेतला. काहीजण तर अबाल वृद्धांसह धबधब्याच्या खाली भिजण्याचा आनंद घेत होते. एकूणच पर्यटकांच्या या गर्दीच चित्र पुढे चालून अधिक मोठं होऊ शकतं यात काही शंका नाही.

टायगर, लायन्स पॉईंट हे पर्यटनासाठी बंद असताना नागरिक बिनधास्त त्या ठिकाणी वावरत होते. दरम्यान, पोलीस बंदोबस्त नसल्यासंबंधी लोणावळा शहर पोलीस पवार यांना यासंबंधी विचारले असता, आज शरद पवार यांचा जुन्नर येथे कार्यक्रम असल्याने तिथे पोलीस कर्मचारी तैनात असल्याचं सांगण्यात आलं. लोणावळा शहर पोलिसांना मनुष्यबळ कमी असल्याचं यानिमित्ताने दिसून आलं.