विक्रेत्यांसमोरील चिंता मिटली; बाजारात आब्यांची आवक वाढणार

आंब्याचा हंगाम सुरू झाला असून मार्केट यार्डातील बाजारात येत्या काही दिवसांत आंब्याची आवक आणखी वाढणार आहे. बाजारात मोठय़ा प्रमाणावर आंबा विक्रीसाठी दाखल झाल्यानंतर साठवणूक कोठे करायची, असा प्रश्न आंबा विक्रेत्यांपुढे पडतो. या पाश्र्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आंबा साठवणुकीसाठी मंडप (शेड) उभारण्यात आले आहेत.

गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात आंब्याची आवक सुरू झाली आहे. आंब्याची आवक मोठय़ा प्रमाणावर झाल्यानंतर बाजारात वाहतुकीची कोंडी होते तसेच व्यापाऱ्यांना आंबा ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसते. किरकोळ ग्राहक बाजारात आंबा खरेदीसाठी गर्दी करतात. व्यापाऱ्यांना आंबा ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला होता, मात्र पर्यायी जागेत मंडप उभारण्याचे काम कोणाला द्यायचे यावर एकमत होत नव्हते. आंब्याचा हंगाम सुरू होऊन महिना उलटला आहे. मंडप उभारण्यात न आल्यामुळे व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय होत होती.

आंबा साठवणुकीसाठी स्वतंत्र मंडप उभारण्यासाठी स्वतंत्र जागेची आवश्यकता होती. वीस गुंठे जागेवर मंडप उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. सुरुवातीला मंडप उभारण्यासाठी एका कंत्राटदाराने १८ रुपये प्रतिचौरस फूट या दराने काम करण्याचा प्रस्ताव दिला होता. आंब्याच्या हंगामात तीन महिने मंडप असतो.

तीन महिन्यांसाठी बांधण्यात आलेल्या मंडपाचा खर्च १८ रुपये चौरस फूट दरानुसार चौदा लाख रुपयांपर्यंत पोहोचला होता. या कंत्राटदाराने दिलेल्या रकमेवर आक्षेप घेण्यात आला होता. दरम्यान, एका मंडप कंत्राटदाराने दहा रुपये प्रतिचौरस फूट या दराने काम करण्याचा प्रस्ताव दिला होता. अखेर त्या कंत्राटदाराकडून मंडप उभारण्याचे काम निश्चित करण्यात आले. आंबा साठवणुकीसाठी मंडप उभारण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.

या बाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे म्हणाले, आंबा साठवणुकीसाठी स्वतंत्र मंडप उभारण्यात आला आहे. व्यापारी प्रतिनिधींसोबत मंडपाची पाहणी करण्यात आली आहे. ही जागा भाडेतत्त्वावर देण्यात येणार नाही. दोन महिन्यांसाठी व्यापाऱ्यांना ही जागा फक्त वापरासाठी दिली जाणार आहे. आंबा साठवणुकीच्या वेळी व्यापाऱ्यांना जागेवर हक्क सांगता येणार नाही. उपलब्ध जागेनुसार त्यांना साठवणूक करता येईल.

पैसे वाचले आणि व्यापाऱ्यांची गैरसोयही टळली

आंबा साठवणुकीची  शेड उभारण्यासाठी दोन ठेकेदारांनी वेगवेगळे दर दिले होते. त्यापैकी एका ठेकेदाराने दहा रुपये चौरस फूट दर दिल्याने त्याला मंडप उभारण्याचे काम देण्यात आले. एका ठेकेदाराने अठरा रुपये चौरस फूट दर दिला होता. अठरा रुपये चौरस फूट दराने चौदा लाख रुपये खर्च येणार होता. दहा रुपये चौरस फूट दर दिल्याने खर्च कमी झाला आहे. त्यामुळे बाजार समितीचे पैसे वाचले असून व्यापाऱ्यांची गैरसोय टळली आहे.