News Flash

संक्रांतीसाठी चिक्की गुळाची मोठी आवक

गेल्या काही दिवसांपासून रसायनविरहित गुळाला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे.

गृहिणी, मिठाई विक्रेत्यांकडून मागणी

पुणे : मकर संक्रांतीसाठी लागणाऱ्या चिक्की गुळाची आवक बाजारात वाढली असून तिळवडी, गूळ पोळी, लाडू, चिक्की आदी पदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकांकडून चिक्की गुळाला चांगली मागणी आहे.

बाजारात एक आणि अर्धा किलोच्या खोक्यात चिक्की गूळ विक्रीसाठी उपलब्ध आहे. चिक्की गुळाबरोबरच रसायनविरहित गूळही बाजारात आला असून त्या गुळालाही मागणी आहे. पुणे जिल्ह्य़ातील दौंड, केडगाव आणि सातारा जिल्ह्य़ातील कराड, पाटण येथून, तसेच सांगली भागातून मार्केट यार्डातील भुसार बाजारात चिक्की गूळ विक्रीसाठी पाठविला जात आहे. चिक्की गुळाचा वापर तिळगूळ, गूळ पोळी, गोडी शेव, चिक्की आदी पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. चिक्की गुळाला घाऊक बाजारातील प्रतिक्विंटलचा भाव ३९०० ते ४२०० रुपये आहे. चिक्की गूळ एक किलो आणि अर्धा किलोच्या खोक्यांमध्ये उपलब्ध आहे, असे भुसार बाजारातील गूळ व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी सांगितले.

गेल्या पंधरा दिवसांपासून बाजारात चिक्की गुळाची आवक वाढली आहे. मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज गुळाच्या ५०० ते १००० खोक्यांची तसेच २०० ते ५०० चिक्की गुळाच्या ढेपांची आवक होत आहे. साध्या गुळाच्या दररोज तीन ते चार हजार ढेपांची आवक होत आहे. मार्केट यार्डातील बाजारातून चिक्की गूळ खरेदी करून खाद्यपदार्थ व्यावसायिक त्यापासून संक्रांतीसाठी लागणारे खाद्य पदार्थ तयार करतात. संक्रांतीनंतर यात्रा, उत्सवांचा काळ असतो. त्यामुळे या कालावधीत गुळाला चांगली मागणी असते आणि गुळाला भाव चांगला मिळतो. त्यामुळे या काळात गुळाची आवक मोठय़ा प्रमाणावर वाढते. चिक्की गूळ अर्धा किलो, एक किलोच्या खोक्यांमध्ये उपलब्ध असून गृहिणींकडून चिक्की गुळाच्या खोक्यांना चांगली मागणी असल्याचेही बोथरा यांनी सांगितले.

सेंद्रीय गुळाला मागणी

गेल्या काही दिवसांपासून रसायनविरहित गुळाला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. रसायनविरहित गूळ आरोग्याच्या दृष्टीने चांगला मानला जातो. थंडीत गुळाला मागणी वाढते, असे गूळ व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी सांगितले.

चिक्की गुळाचा भाव

* चिक्की गूळ (प्रतिक्विंटल)- ३९०० ते ४२०० रुपये

* चिक्की गूळ खोके (प्रतिक्विंटल ) – ४२०० ते ४७००

* किरकोळ बाजारातील चिक्की गूळ- ५० ते ५५ रुपये प्रतिकिलो

* किरकोळ बाजारात चिक्की गूळ खोके- ५० ते ५५ रुपये प्रतिकिलो

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 2:30 am

Web Title: largest chikki jaggery arrivals in pune for makar sankranti zws 70
टॅग : Makar Sankranti
Next Stories
1 ५०० चौरस फुटापर्यंतच्या सर्व निवासी मिळकतींना मिळकतकरात १०० टक्के माफी
2 पिंपरी शहराध्यक्षपदाचा संघर्ष निवळला
3 नाद करा…पण आमचा कुठं! मुलीचा नंबर मागणाऱ्या नेटकऱ्याला पुणे पोलिसांचं इरसाल उत्तर
Just Now!
X