पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के राखीव जागांसाठीच्या पहिल्या सोडतीत जाहीर झालेल्या प्रवेशांसाठी शनिवार (४ मे) हा अखेरचा दिवस आहे. अद्यापही सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी असल्याने हे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार असल्याचे चित्र आहे.

आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिली सोडत ८ एप्रिलला जाहीर झाली. त्यात राज्यभरातील ६७ हजार ७०६ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आधी २६ एप्रिलची मुदत देण्यात आली. त्यानंतर ही मुदत वाढवून ४ मे करण्यात आली. मात्र, कागदपत्र पडताळणीची संथ गती आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यात अडचणी आल्या.

प्रवेश प्रक्रियेत शुक्रवार अखेपर्यंत ४२ हजार ३८२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. अद्याप जवळपास २५ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. त्यामुळे अखेरच्या दिवशी या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश न झाल्यास उर्वरित विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.