गणेशोत्सवातील अखेरचे पाच दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिवर्धक सुरू ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशीसुद्धा ही परवानगी रात्री बारापर्यंतच असणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री दहा ते पहाटे सहा या वेळात सार्वजनिक ठिकाणी ध्वनिवर्धक सुरू ठेवण्यासाठी र्निबध आहेत. त्यामध्ये वर्षांतील पंधरा दिवस दोन तासांची मुभा देण्याचे अधिकार राज्य सरकारला देण्यात आले आहेत.
राज्य सरकारने हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामध्ये गणेशोत्सवाला अधिक दिवस ही सवलत मिळावी, अशी मागणी मंडळांकडून होत आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उत्सवामध्ये कोणत्या दिवशी रात्री उशिरापर्यंत ध्वनिवर्धक सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात यावी, या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यामध्ये २३ ते २७ सप्टेंबर हे गणेशोत्सवातील अखेरचे पाच दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिवर्धक सुरू ठेवण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रात्री बारापर्यंत ध्वनिवर्धकास परवानगी देण्यात आली असली, तरी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना गणेशोत्सव मंडळांना देण्यात आल्या आहेत.