मराठी चित्रपटसृष्टीचे सुवर्णयुग पाहण्याचे भाग्य लाभलेला मूक साक्षीदार आणि मराठी चित्रपटगृहांचे माहेरघर असा नावलौकिक लाभलेल्या ‘प्रभात’ चित्रपटगृहामध्ये रसिकांना केवळ चारच दिवस चित्रपट पाहता येणार आहेत. प्रभात चित्रपटगृह व्यवस्थापनाने गुरुवार (२५ डिसेंबर) हा अंतिम दिवस निश्चित केला आहे.
इंदूर येथील संस्थानिक रामचंद्र किबे यांच्या मालकीचे हे चित्रपटगृह आहे. पत्नी लक्ष्मी यांची स्मृती जतन करण्याच्या उद्देशातून त्यांनी ‘किबे लक्ष्मी थिएटर असे नामकरण केले होते. मराठी चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या प्रभात फिल्म कंपनीच्या भागीदारांनी हे चित्रपटगृह चालविण्यासाठी घेतले आणि प्रभात फिल्म कंपनीवरून या चित्रपटगृहाचे प्रभात असे नामकरण करण्यात आले होते. या भागीदारांपैकी विष्णूपंत दामले यांचे नातू विवेक दामले यांच्याकडे चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. कराराची मुदत संपुष्टात आल्यामुळे हे चित्रपटगृह १० जानेवारी रोजी सरदार किबे यांचे नातू अजय किबे यांच्याकडे हस्तांतरित होणार आहे. त्यामुळे २५ डिसेंबर ही प्रभातमध्ये चित्रपट पाहण्याची अखेरची तारीख ठरविण्यात आली आहे.
चित्रपटगृह बंद केल्यानंतर पुढील कामांचा निपटारा करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. चित्रपट वितरकांचे हिशोब पूर्ण करून बाकीची कामे आटोपावी लागणार आहेत. वर्षअखेरीपूर्वी ही कामे पूर्ण करावयाची असल्यामुळे त्यामुळे २५ डिसेंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती विवेक दामले यांनी दिली.