सध्या परीक्षांमधील चुकांचे प्रदर्शन भरवल्याप्रमाणे रोज नव्या चुका करणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने शनिवारी जैवतंत्रज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षांच्या परीक्षेसाठी गेल्याच वर्षीची प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांना पाठवली. त्यामुळे परीक्षेच्या सुरुवातीला अनेक केंद्रांवर गोंधळाचे वातावरण होते.
पुणे विद्यापीठाचा परीक्षा विभाग सध्या रोज नव्या गोंधळामुळे चर्चेत आहे. जैवतंत्रज्ञान शाखेची परीक्षा २४ मार्चपासून सुरू झाली. या शाखेची शनिवारी ‘बायोफिजिक्स अँड इन्स्ट्रमेंटेशन’ या विषयाची पहिल्या वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होती. या परीक्षेसाठी विद्यापीठाने परीक्षा केंद्रांना गेल्याच वर्षीची प्रश्नपत्रिका पाठवली. परीक्षा सुरू झाल्यानंतर काही वेळात झालेला घोळ लक्षात आला. त्यानंतर सर्व केंद्रांना या वर्षीची प्रश्नपत्रिका पाठवून आधीची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांकडून परत घेण्यात आली. विद्यापीठाने पाठवलेली प्रश्नपत्रिका चुकीची असल्याचा निरोप मिळून ती बदलण्याच्या प्रक्रियेमध्येही काही केंद्रांवर वेळ गेला. या सगळ्या प्रकारामुळे काही केंद्रांवर गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडूनच चुकीची प्रश्नपत्रिका पाठवण्यात आल्याचे महाविद्यालयांकडून सांगण्यात आले आहे.
पुणे विद्यापीठाकडून या वर्षीपासून सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी काही वेळ ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येते. महाविद्यालयांनी त्यांचा पासवर्ड वापरून प्रश्नपत्रिकेच्या आवश्यक तेवढय़ा प्रती काढून ती विद्यार्थ्यांना द्यायची असते. मात्र, विद्यापीठाच्या आयटी विभागाकडूनच प्रश्नपत्रिका पाठवण्यामध्ये गोंधळ झाला असल्याचे समजते.