देशाच्या आरोग्यासाठी आपण सर्वग्राही धोरण तयार केले, तर गरिबातल्या गरिबालाही स्वस्तात स्वस्त वैद्यकीय उपचार मिळू शकतील आणि या धोरणामुळे भारत जगालाही वैद्यकीय क्षेत्रात कवेत घेऊ शकेल. वैद्यकीय क्षेत्रात भारताचे नाव जगात अग्रगण्य होईल, असा विश्वास गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केला. मेडिकल इन्शुअरन्सपेक्षा हेल्थ अॅशुअरन्सला मी अधिक महत्त्व देतो, असेही ते म्हणाले.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन शुक्रवारी मोदी यांच्या हस्ते करण्यात आले; या वेळी ते बोलत होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. गानसम्राज्ञी लता मंगशेकर, पं. हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले, डॉ. धनंजय केळकर, उषा मंगेशकर, मीना खडीकर आणि आदिनाथ मंगेशकर यांची या वेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. हरिष भिमाणी यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमातील अध्र्या तासाच्या भाषणात मोदी यांनी देशातील आरोग्याच्या समस्या, देशात आणि जगात वैद्यकीय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या संधी आणि सर्वसामान्यांनाही स्वस्तात आरोग्यसेवा देणे किती आवश्यक आहे या मुद्यांवर भर दिला. उपचार करून घेण्यासाठी केले जाणारे पर्यटन मोठय़ा प्रमाणावर वाढत असून भारताला त्यात संधी आहे. अनेक युरोपीय देशात आता वृद्धांचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेथे मोठय़ा संख्येने डॉक्टर आणि परिचारिकांची गरज निर्माण झाली आहे. या पाश्र्वभूमीवर भारत जगातील युवा देश आहे आणि आरोग्याच्या क्षेत्रात भारताने कुशल मनुष्यबळ निर्माण केले, तर आपण जग जोडू शकतो, असे मोदी म्हणाले.
मेडिकल इन्शुअरन्स मी नाकारत नाही; पण सामान्यातल्या सामान्य माणसाला हेल्थ अॅशुअरन्स मिळाला पाहिजे. त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांचे जाळे देशात निर्माण करावे लागेल आणि त्याचे शिक्षण देणारे अल्प मुदतीचे अभ्यासक्रमही सुरू करावे लागतील. उपचारांबरोबरच जीवन निरोगी राहील यासाठी देखील अनेक उपाययोजना कराव्या लागतील. तसेच झाले, तरच देशातील आरोग्याची स्थिती चांगली होईल, असेही मोदी यांनी सांगितले.
मोदी पंतप्रधान व्हावेत- लतादीदी
रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी कोणाला बोलवायचं अशी चर्चा झाल्याबरोबर पहिलं जर कोणाचं नाव डोक्यात आलं असेल, तर ते नरेंद्र मोदी यांचं. त्यांनाच बोलवा असा मी आग्रह धरला होता. ते मला भावासारखेच आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले पहायला मिळावेत, ही आपल्या सगळ्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण होऊदे, अशी माझी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे, अशा शब्दांमध्ये गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी मोदी यांना जाहीर भाषणातून शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी मात्र त्यांच्या भाषणात या मुद्याला स्पर्श केला नाही.